मुंबई : कर्नाटकातील सत्तासंघर्ष रोज नवीन वळणं  घेत आहे. राजीनामे दिलेले काँग्रेस-जेडीएसचे आमदार मुंबईतील रेनेसॉंस या हॉटेलमध्ये आहेत. या  बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र शिवकुमारांना हॉटेलबाहेरच थांबवण्याची मागणी या आमदारांनी केली आहे.


कर्नाटक सरकार आम्हाला पळवून नेण्याच्या प्रयत्नात, आम्हाला सुरक्षा पुरवा, डी शिवकुमार यांना येऊ देऊ नका, त्यांना हॉटेलबाहेरच थांबवा अशी मागणी  बंडखोर आमदारांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेलबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे.

यावेळी बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडून 'कुमारस्वामी गो बॅक' च्या घोषणा देण्यात आल्या. तर दुसरीकडे शिवकुमार यांनी माझी रूम इथे बुक आहे. माझे भाऊ इथे आहेत. मला इथं येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

सध्या रेनेसॉंस हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा असून कर्नाटकच्या सत्तासंघर्षाला आता नेमके काय वळण येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

केवळ पाचच आमदारांचे राजीनामे पात्र, विधानसभा अध्यक्षांची माहिती, कुमारस्वामींना दिलासा

दरम्यान, कर्नाटकातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.  भाजपसाठी सत्तेचा मार्ग रिकामा दिसत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी काल केवळ पाचच आमदारांचे राजीनामे योग्य असल्याचे सांगितले आहे. यामुळे कुमारस्वामी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे.

अध्यक्षांनी 8 आमदारांचा राजीनामा योग्य पद्धतीने मिळाला नसल्याचे सांगितले आहे. केवळ पाच आमदारांचा राजीनामा योग्य पद्धतीने आल्याचे सांगण्यात आले आहे. अध्यक्षांनी यातील तीन आमदारांना 12 जुलैला तर दोन आमदारांना 15 जुलैला बोलावले आहे.

अध्यक्षांच्या या निर्णयाने कुमारस्वामी सरकारला सरकार वाचवण्यासाठी वेळ मिळाला आहे. मात्र दुसरीकडे मंगळवारी काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीला नऊ आमदार अनुपस्थित होते. यापैकी सात आमदारांनी या बैठकीत येणार नसल्याचे पहिलेच कळवले होते. यातील आणखी दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

सरकारवाचवण्यासाठी दिल्लीतून देखील हालचाली सुरु आहेत. काँग्रेस पक्षाने  गुलाम नबी आजाद आणि बीके हरिप्रसाद यांना बंगळुरूला पाठवले आहे. दुसरीकडे भाजपकडून देखील जोरदार प्रदर्शन केले जात आहे. येडियुरप्पा आज राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतील, असेही सूत्रांकडून कळले आहे.

त्यातच काँग्रेसचे आमदार  रोशन बेग यांनी देखील राजीनामा दिला असून आता राजीनामा देणाऱ्या काँग्रेस-जेडीएस आमदारांची संख्या 14 झाली आहे. तर दोन अपक्षांनी देखील भाजपाला पाठिंबा दर्शविला आहे.

कर्नाटकातील सत्तासंघर्षाचे जोरदार पडसाद लोकसभेत देखील उमटले होते. भाजपकडून लोकशाहीचा अवमान होत असल्याची टीका काँग्रेसने केली तर कर्नाटकात जे होत आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले होते.

आता या आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर कर्नाटक राज्यातील बहुमत हे भाजपकडे झुकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या बंडखोरांना शमविण्यासाठी जेडीएसने नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकच्या जेडीएस सरकारमधील सर्वच्या सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील 21 च्या 21 मंत्र्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार आहेत. तर जेडीएसकडे 37 आमदार आहेत. दोन्ही मिळून 117 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. तसेच बहुजन समाज पार्टी आणि एका अपक्ष आमदारानेदेखील या सरकारला पाठिंबा दिला होता.

संबंधित बातम्या

कर्नाटकातील सत्तासंघर्ष : कुमारस्वामी यांचं सरकार लवकरच कोसळण्याची शक्यता, राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या 15 वर

कर्नाटक सत्तासंघर्ष | काँग्रेस-जेडीएस सरकारमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे तर भाजपकडून मात्र मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता, राजीनामा दिलेले आमदार मुंबईतल्या हॉटेलमध्ये दाखल

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकारला धक्का, 11 आमदारांचा राजीनामा