नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) च्या सहकार्याने नवी दिल्ली येथे 5 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) आयोजित करत आहे. ‘आशिया खंडाच्या बळकटीकरणात बुद्ध धम्माची भूमिका’ ही या शिखर परिषदेची मुख्य संकल्पना आहे.  या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi murmu) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, देशभरातील बौद्ध धर्मीयांसह आशिया खंडातील विविध देशांतील नागरिकांचेही या परिषदेकडे लक्ष लागले आहे.


शिखर परिषदेच्या माध्यमातून, संवादाला चालना देण्यासाठी, समजूतदारपणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बौद्ध समुदायाला भेडसावणाऱ्या समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आशिया खंडातील विविध बौद्ध परंपरेतील संघाचे नेते, विद्वान, तज्ञ आणि अभ्यासक एकत्र येतील. येथील परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील विषयांवर विचारमंथन होणार आहे. त्यामध्ये, बौद्ध कला, बौद्ध धर्माचे महत्व यांसह बौद्ध धर्माच्या परंपरा, संस्कृती व सामाजिक दृष्टीकोन या परिषदेतून मांडला जाईल. 


आशियाई बौद्ध शिखर परिषदेत खालील विषयांचा समावेश असेल:


1. बौद्ध कला, वास्तुकला आणि वारसा.
2. बौद्ध कारिका आणि बौद्ध धम्माचा प्रसार.
3. पवित्र बौद्ध अवशेषांची भूमिका आणि समाजातील त्याची प्रासंगिकता.
4. वैज्ञानिक संशोधन आणि कल्याणामध्ये बौद्ध धम्माचे महत्त्व.
5. 21 व्या शतकात बौद्ध साहित्य आणि तत्वज्ञानाची भूमिका.
दरम्यान, वरील विषयांतील चर्चेबरोबरच, 'आशियाला जोडणारा धम्म सेतू (पूल) - भारत' या संकल्पनेवर आधारित एक विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.  कार्यक्रमाच्या ठिकाणी इतर सृजनात्मक प्रदर्शनांसह इतर कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.


हेही वाचा


Manoj jarange: त्रास दिला त्याला पाडून बदला घ्यायचा; मनोज जरांगेंचा बीडमधून पहिला उमेदवार रिंगणात