जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी काही दिवसांपूर्वीच आपण उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. मुस्लीम, दलित व मराठा समाजाला एकत्रितपणे घेऊन आपण निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, जरांगे पाटील यांनी आज अंतरवालीतून उमेदवार देण्यात येणाऱ्या मतदारसंघांची घोषणा केली. त्यामध्ये, बीड (Beed) जिल्ह्यातील बीड मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे, बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना जरांगे पाटील यांच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघाबाबत मनोज जरांगे यांनी निर्णय अद्याप राखून ठेवला आहे. उमेदवार देण्याच्या किंवा पाडण्याच्या यादीत परळी मतदारसंघाचं नाव नाही.
आम्ही मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत आणि निवडून येणार तेवढेच निवडणूक लढणार आहेत. लढण्याची इच्छा अनेकाची असते. परंतु, आपल्याला समाज जपायचा आहे. राजकारणाच्या नादात समाज हरता कामा नये. एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा. पण उमेदवार पडून अपमान सहन करण्याची ताकद आपल्यात नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी काही मतदारसंघांची घोषणा केली असून या मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय.
मनोज जरांगे यांनी काही संभाव्य मतदारसंघाची बैठकीत नाव घेतली. संभाजी नगरमधील फुलंब्री मतदारसंघातून उमेदवार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तर, बीड जिल्ह्यातील 2 मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत. त्यामध्ये बीड तालुका आणि केज (राखीव, मतदारसंघ) मधून जरांगे पाटील यांचे उमेदवार देण्यात येतील, असे दिसते. जिल्ह्यात काही पाडायचे आहेत. जिथं त्रास दिला आहे, त्याला पाडून बदला घ्यायचा आहे. बीड विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. गेवराई आणि आष्टीबाबतनंतर चर्चा करून बघू. तर, केज (राखीव) बाबत स्थानिक मराठा जे निर्णय घेतली तो निर्णय घेऊ, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राखीव मतदारसंघाबाबत 10 तारखेनंतर निर्णय घेऊ, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले .
रावसाहेब दानवेंच्या मुलीविरुद्ध उमेदवार
जालना जिल्ह्यातून परतूर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. तसेच, संभाजीनगर जिल्ह्यातून संभाजीनगर - फुलंब्री आणि कन्नड मतदारसंघ लढवण्याची घोषणाही जरांगे पाटील यांनी केली आहे.
हिंगोलीत उमेदवार देणार
हिंगोली विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे उमेदवार देणार आहेत. महायुती भाजपकडून तान्हाजी मुटकुळे येथील उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाच्या रूपाली पाटील यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे, जरांगेंचा उमेदवार कोण हे लवकरच स्पष्ट होईल.
कळमनुरीत उमेदवार पाडणार
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांनी पाडण्याचा निर्णय घेतलाय. सध्या कळमनुरी विधानसभेत महायुतीकडून शिवसेनेने संतोष बांगर यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरेकडून संतोष टारफे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात मनोज जरांगे पाटील नेमकं कोणाला पाडणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा
विषारी सापाच्या तोंडातून हिरवे फुत्कार मतांच्या लालसेपोटी; दरेकरांची आव्हाडांवर जहरी टीका