Pappu Yadav News पाटणा : बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावानं धमकी देण्यात आली होती. पूर्णिया पोलिसांन पप्पू यादव यांना धमकी देणाऱ्या युवकाला दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या आरोपीचं नाव महेश पांडेय असं आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी खासदार पप्पू यादव धमकी प्रकरणात पोलिसांकडून तपास कार्य सुरु होतं, अशी माहिती दिली. पोलिसांच्या तपासादरम्यान महेश पांडेय पोलिसांच्या रडारवर आला होता. पोलिसांनी पांडेयला दिल्लीतून अटक केली. महेश पांडेय याच्या चौकशीतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याचा लॉरेन्स बिश्नोईशी त्याचा काही संबंध नाही.
मोठ्या व्यक्तींसोबत संबंध
पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी महेश पांडेय बाबत आणखी माहिती दिली. पांडेयचे मोठ्या लोकांसोबत थेट संपर्क आहेत. त्यानं एम्स आणि काही मंत्रालयांच्या कँटीनमध्ये काम केलेलं आहे. मात्र, तो सध्या कुठंच काम करत नव्हता.प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती पोलिसांनी दिली असून आरोपीला कोर्टात हजर करुन रिमांड घेत चौकशी करणार असल्याचं ते म्हणाले.
कार्तिकेय शर्मा म्हणाले, महेश पांडेय याचा काही खासदारांच्या सहकाऱ्यांशी संबंध राहिलेला आहे. याशिवाय पप्पू यादव धमकी प्रकरणात सर्व शक्यतांच्या अनुषंगानं चौकशी केली जात असल्याचं म्हटलं. अनेक फोन नंबरवरुन धमक्या देण्यात आल्या होत्या. ज्या फोन नंबरवरुन पहिल्यांदा धमकी देण्यात आली होती त्याचा तपास केल्यानंतर महेश पांडेयला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पप्पू यादव यांना ज्या फोन नंबरवरुन धमकी देण्यात आली होती तो दुबईचा होता. महेश पांडेयची मेहुणी दुबईत राहते, तिथून सीमकार्ड आणल होतं. याप्रकरणी अजून तपास सुरु आहे.
मुंबईत बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर पप्पू यादव यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं होतं. पप्पू यादव आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वादातून धमकी दिली गेल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. तर, आता महेश पांडेयच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येतील.
इतर बातम्या :