अशोक चव्हाण यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस बनवण्याचा सोनिया गांधींचा इरादा होता. दीपक बाबरिया यांच्याजागी मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून त्यांना जबाबदारी मिळणार होती. परंतु अशोक चव्हाण यांनी आपल्याला राज्यातच काम करायला आवडेल, असं सांगून सोनिया गांधींच्या या इच्छेला नकार दिला. अशोक चव्हाण म्हणाले की, "महाराष्ट्रात आता निवडणूक आहे. मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नसलो तरी मी माझ्या राज्यात राहून पक्षासाठी काम करेन."
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अशोक चव्हाणही महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार झाले होते. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आता सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर अशोक चव्हाण यांना मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळणार होती. परंतु त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. सोनिया गांधींचं म्हणणं आहे की, "अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील बडे राजकीय नेते आहेत. त्यांना दिल्लीत आणून त्यांच्या अनुभवाचा वापर करता येईल."