मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था ढासळली, मनमोहन सिंग यांची टीका
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2019 02:53 PM (IST)
देशाचा जीडीपी 5 टक्क्यावर आला असल्याबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच या परिस्थितीतून सावरण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्या नाहीतर परिस्थिती आणखी गंभीर होईल, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं.
NEXT PREV
नवी दिल्ली : देशाच्या जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीवरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटबंदी आणि जीएसटी यासारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका मनमोहन सिंह यांनी केली. मागील तिमाहीत जीडीपी 5 टक्के होता. यातून असं दिसून येत की देश मोठ्या आर्थिक मंदीतून जात आहे. वेगाने विकास करण्याची क्षमता भारताकडे आहे. मात्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ थेट 0.6 टक्क्यांनी घसरल्यामुळे स्थिती चिंताजनक आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सावरली नसल्याचं यातून स्पष्ट होतं, असं मनमोहन सिंह यांनी म्हटलं. मोदी सरकारने राजकारण बाजूला सारुन या मंदीच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तज्ज्ञ मंडळींचे सल्ले गांभीर्याने घेणे गरजेचं आहे, असं मनमोहन सिंह यांनी सुचवलं. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर आणि चिंताजनक आहे. मोदी सरकारच्या चुकीची धोरणं आणि योजनांमुळे देशावर बेरोजगारीचं मोठं संकट ओढावलं आहे. केवळ ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये साडेतीन लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या आहेत आणि इतर क्षेत्रातील नोकऱ्याही धोक्यात आहेत, असं मनमोहन सिंह यांनी सांगितलं.