मुंबई : इंफोसिसचे (Infosys) संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील युवकांनी 70 तास काम करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर भारतपे चे सह संचालक अश्नीर ग्रोवर यांनी प्रतिक्रिया दिलीये. अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया देत नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy) यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नारायण मूर्ती यांनी केलेल्या या विधानावर सध्या अनेक मतमतांतरे असल्याचं पाहायला मिळत आहे.त्यातच आता अश्नीर ग्रोवर यांनी देखील त्यांच्या या मताशी असहमती दर्शवली आहे. 


इन्फोसिस या संस्थेचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.  भारताला महाशक्ती बनायचं असेल, अर्थव्यवस्थेमध्ये चीनला मागे टाकायचं असेल तर तरुणांना आठवडाभरात किमान 70 तास काम करायला हवं, असं नारायण मूर्ती म्हणाले. नारायण मूर्ती यांनी 'द रिकॉर्ड'  या पॉडकास्टमध्ये मोहनदास पै  यांच्यासोबत गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी तरुणांना हा 70 तासांचा सल्ला दिला. 


काय म्हणाले अश्नीर ग्रोवर?


अश्नीर ग्रोवर यांनी म्हटलं की, नारायण मूर्ती यांच्या विधानावर दोन गोष्टींसाठी नागरिक नाराज झाले असावेत. कारण अजूनही भारतात कामातून मिळालेल्या आऊटकम पेक्षा किती तास काम केलं जातं यावर तुमचं काम ठरवलं जातं. दुसरा मुद्दा म्हणजे लोकांना यामुळे असं वाटतयं की भारतातील तरुणांच्या आळसामुळे भारताचा विकास खुंटलाय. विशेष म्हणजे लोकांची सध्या जी नाराजी आहे, ती आपल्याला इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा जास्त जवळ आणि एकत्र आणते. यामध्ये क्रिकेट, जात, धर्म यांच्यापेक्षा कोणावर तरी नाराजी व्यक्त करणं यामुळे लोकांनी जास्त एकजूट होते.






नारायण मूर्तींनी काय म्हटलं?


जर आपण चीन (China) आणि जपान (Japan) यासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशांशी स्पर्धा करायची असेल, तर आपल्याला उत्पादकता अर्थात प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. सध्या भारताची उत्पादकता कमी आहे. शिवाय आपली सरकारे निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात तो सुद्धा खूप आहे. त्यातच सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारावर अंकूश लावणे आवश्यक आहे. हे सर्व पाहता भारतातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावं लागेल, असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं  


हेही वाचा : 


Narayana Murthy : नारायण मूर्तींचा नवा फॉर्म्युला, तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला