Punjab Viral Video: पंजाबमधील (Punjab) कपूरथला येथील उपविभाग सुलतानपूर लोधी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शालापूर बेट गावातील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला चक्क गाडीच्या बोनेटवर लटकवलं, त्याला गाडीवर बसवून 10 किमीपर्यंत भरधाव वेगात गाडी नेली. शेवटी या मुलाने गाडीवरुन उडी मारली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रत्येकालाच धक्का बसला आणि त्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


नेमकं घडलं काय?


मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने सांगितलं की तो सुलतानपूर लोधी येथील एका खाजगी अकादमीमध्ये IELTS चं शिक्षण घेत होता. जेव्हा तो क्लासजवळ असलेल्या रस्त्यावर उभा होता, त्यावेळी एक कार आली, ज्यामध्ये त्याचे शिक्षक बलजिंदर सिंग बसलेले होते. त्यांच्या गाडीने या मुलाला धडक दिली आणि मुलाला बोनेटवर लटकलेल्या अवस्थेत संपूर्ण परिसरात गाडी तुफान वेगात पळवली.


शेवटी दादविंडी परिसराजवळ गाडी आल्यावर या विद्यार्थ्याने उडी मारून आपला जीव वाचवला. परंतु या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला, त्याच्यावर सध्या शासकीय आरोग्य केंद्र टिब्बा येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमागे जुना वाद असल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे, लोक हा व्हिडीओ पाहून चांगलेच भडकले आहेत.


व्हायरल झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून थक्क व्हाल






पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू


वेगवान कारच्या बोनेटवर एक विद्यार्थी बसला असून कार भरधाव वेगात जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. विद्यार्थ्याने सांगितलं की, या शिक्षकावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत आणि पीडित विद्यार्थी आता आरोपी शिक्षकाला अटक करण्याची मागणी करत आहे. आपल्या मुलाला दिलेल्या अमानुष वागणुकीनंतर या मुलाच्या पालकांनीही अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षक सध्या फरार आहे, दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


हेही वाचा:


Women Fight : बसमध्ये महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, सीटसाठी WWE फाईट; व्हिडीओ तुम्ही पाहिला का?