Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाची ना कोणाशी दोस्ती आहे, ना कोणाशी दुश्मनी आहे.  आमच्यासाठी देश महत्वाचा आहे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज रात्री आठ वाजता एबीपी न्यूजच्या 'इंडिया चाहता है' या कार्यक्रमात मुलाखत देताना अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. एबीपी न्यूजच्या सुमित अवस्थी यांनी केजरीवाल यांची खास मुलाखत घेतली.  


अरविंद केजरीवाल म्हणाले, राजकीय नेत्यांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. परंतु, आम आदमी पक्षाच्या बाबतीत असे नाही. दिल्लीमध्ये आम्ही केलेले काम लोकांनी पाहिले आहे. शिवाय पंजाबमध्ये सरकार बनवल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले. लोकांचा विश्वास आम्हाला परत आणायचा आहे. त्यासाठी आम्ही फक्त काम करू शकतो आणि ते करत आहोत."


"भाजपने जनतेचे ऐकणे बंद केले असून त्यांच्यात अहंकार निर्माण झाला आहे. परंतु, आमच्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. आम्हाला माहित आहे की लोक कोणाला निवडून देतात आणि कोणाचा पराभूत करतात. दिल्लीत आम्ही शीला दीक्षित यांचा दिल्लीत आणि पंजाबमध्ये चरणजितसिंग चन्नी यांचा पराभव केला. परंतु, त्यांना आम्ही हरवले ही गोष्ट मी मानत नाही. कारण आम्हाला कोणत्याही पक्षापासून मुक्त भारत बनवायचा नाही तर आनंदी भारत बनवायचा आहे, असे मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. 


केजरीवाल म्हणाले, "लोकांना वाटले की ही मुले काम करू शकतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्ही त्यांच्या विश्वासावर उतरण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम सर्वांच्या समोर आहे."


महत्वाच्या बातम्या