Amritpal Singh Wife : वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर (Kirandeep Kaur) ही लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती, मात्र विमानात बसण्यापूर्वीच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर लंडनची फ्लाईट पकडण्यासाठी अमृतसर विमानतळावर पोहोचली होती. त्यावेळी विमानतळावरून तिला ताब्यात घेण्यात आले. अमृतपालची पत्नी किरणदीप कौर सकाळी 11.40 वाजता विमानतळावर पोहोचली, दुपारी 2.30 च्या फ्लाईटने ती ब्रिटनला जात होती. त्याआधीच अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.


किरणदीप कौरचे यादीत नाव पाहून विमानतळाच्या इमिग्रेशन काऊंटरवर तिला रोखण्यात आले आणि तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पंजाब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लूक आऊट नोटीस जारी असल्यामुळे इमिग्रेशनने किरणदीप कौरला प्रवास करू दिला नाही आणि तिला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले.


पंजाबच्या पोलिसांनी 18 मार्च रोजी वारिस पंजाब दी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई केली होती. यावेळी पोलिसांनी त्याचे शेकडो सहकारी आणि समर्थकांना अटक केली. मात्र त्यावेळी अमृतपाल पळून जाण्यात यशस्वी झाला, तेव्हापासून पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत आहेत. एवढेच नाही तर पोलीस त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांचीही सतत चौकशी करत आहेत.


ब्रिटनची नागरीक आहे किरणदीप कौर


अमृतपालची पत्नी किरणदीप कौरची दहशतवादी संघटना बब्बर खालसाशी जवळीक आहे. लग्नापूर्वी किरणदीप एका ऑनलाइन कंपनीत काम करत होती. वर्षभरापूर्वी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अमृतपालच्या संपर्कात आली होती. सध्या ती काहीही काम करत नसून किरणदीप कौर ही ग्रेट ब्रिटनची (यूके) नागरीक आहे.


अमृतपालशी कधी झाले लग्न?


किरणदीप कौरचा विवाह अमृतपालसोबत फेब्रुवारीमध्ये अमृतसरच्या जल्लूपूर खेडा गावात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नात फोटो काढण्यास मनाई होती. कुणाला फोटो काढायचा असला तरी मागून फक्त किरणदीप कौरचा फोटो काढण्यास परवानगी होती, समोरुन फोटो काढण्याची परवानगी नव्हती.


दोघांचे लग्न अगदी खाजगी पद्धतीने झाले. एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पत्नीमुळे तो ओळखला जाऊ शकतो, अशी कदाचित अमृतपालची भीती होती.


अमृतपालला कधी सोडून जाणार नाही


सुरक्षा यंत्रणांना अद्याप अमृतपालचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. यापूर्वी किरणदीप कौर म्हणाली होती की, मी अमृतपालसाठी माझी नोकरी आणि कुटुंब सोडले आहे, आता मी त्याला या अवस्थेत सोडणार नाही. त्यानंतरच आज किरणदीर कौर लंडनला जाण्याच्या तयारीत होती.


संबंधित बातम्या:


Amritpal Singh : अमृतपालच्या शोधात नांदेड पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन; समर्थकांची झाडाझडती