अहमदाबाद: गुजरात दंगलीतील नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 11 जणांची हत्या झालेल्या या प्रकरणात गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्वच म्हणजे 86 आरोपींची सुटका करण्यात आली आहे. गुजरात दंगली प्रकरणातील हा अत्यंत महत्त्वाचा निकाल समजला जातो.
28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद शहराजवळील नरोडा येथे झालेल्या जातीय हिंसाचारात 11 लोक मारले गेले. या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह 86 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेष न्यायमूर्ती एसके बक्षी यांच्या न्यायालयाने या प्रकरणी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. 2010 मध्ये सुरू झालेल्या खटल्यादरम्यान, फिर्यादी आणि बचाव पक्षाने 187 साक्षीदार आणि 57 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले आणि सुमारे 13 वर्षे चाललेल्या या खटल्याची सलग सहा न्यायाधीशांनी सुनावणी केली.
गोध्रा घटनेच्या दुसऱ्या दिवशी नरोडा येथे दंगल
गोध्रा घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला नरोडा गावात बंदची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान सकाळी नऊच्या सुमारास लोकांच्या जमावाने बाजारपेठ बंद करण्यास सुरुवात केली आणि हिंसाचार उसळला. जमावात सामील असलेल्या लोकांनी जाळपोळ सुरू केली, दगडफेक करून तोडफोड केली आणि यात 11 जणांचा बळी गेला.
यानंतर जवळच्या पाटिया गावातही दंगल पसरली होती, येथेही हत्याकांड घडले. या दोन भागात 97 जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या प्रकरणात एसआयटीने तत्कालीन भाजप आमदार माया कोडनानी यांना मुख्य आरोपी बनवले होते. मात्र, या प्रकरणात आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
माया कोडनानी यांचा दावा, दंगलीच्या वेळी त्या विधानसभेत होत्या
ज्या दिवशी ही दंगल झाली त्या दिवशी सकाळी माया कोडनानी यांनी आपण गुजरात विधानसभेत असल्याचा दावा केला होता. तर दुपारी गोध्रा हत्याकांडात मारल्या गेलेल्या कारसेवकांचे मृतदेह पाहण्यासाठी त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. काही प्रत्यक्षदर्शींनी कोर्टात साक्ष दिली की दंगलीच्या वेळी कोडनानी नरोडा येथे हजर होत्या आणि त्यांनी जमावाला भडकवले. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी माया कोडनानी यांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.