नवी दिल्ली : गेल्या सात वर्षात लष्कर, नौदल आणि वायूदलातील 800 जवानांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती सोमवारी केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे. या काळात 'फेट्रिसाईड'चे 20 प्रकरणंही घडल्याचं समोर आलं आहे. देशात एकूण 14 लाख जवान आणि कर्मचारी सशस्त्र दलात काम करत असून आत्महत्येची ही आकडेवारी पाहता परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सशस्त्र दलातील जवानांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि त्यांचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सांगण्यात येतंय. 


संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, 2014 नंतर तब्बल 12 लाख लोकसंख्या असलेल्या लष्करातील 591 जवानांनी आत्महत्या केली. याच काळात भारतीय हवाई दलातील 160 जवानांनी तर नौदलातील 36 जवानांनी आत्महत्या केली. अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी सशस्त्र बलाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. परंतु यामध्ये आणखी उपाययोजनांची आवश्यकता आहे.


दरवर्षी वर्दीतील 100 कर्मचाऱ्यांची आत्महत्या
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, दरवर्षी वर्दीतले 100 कर्मचारी आत्महत्येचा मार्ग निवडतात. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर असणारा तणाव, सैनिकांची मानसिक आणि शारिरीक स्थिती या गोष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी न मिळाल्याने अनेक दिवस घरी जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या तणावात वाढच होते. तसेच वैवाहिक समस्या आणि कुटुंबातील संपत्तीचे वाद असे अनेक कारणेही त्यामागे आहेत. 


संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक राज्यसभेत बोलताना सांगितलं की, सशस्त्र बलातील जवानांना ज्या तणावाला सामोरं जावं लागतं, ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याच्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेन्ट सेशन, काऊन्सेलिंग आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. सध्याही काही उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्या अपुऱ्या असल्याचं दिसून येतंय.


संबंधित बातम्या : 


Indian Army | भारताकडे जगातले चौथे मजबूत लष्कर, मिलिटरी डायरेक्टच्या अहवालातून स्पष्ट
Quad | इंडो-पॅसिफिक प्रदेश मुक्त आणि सुरक्षितच असावा; 'क्वॉड' देशांचा चीनला संदेश