Coronavirus Omicron Covid-19 :  पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, ही काँग्रेस नेत्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काँग्रेस नेत्याला 'तुम्ही काय मंगळावर राहाता काय?' असे म्हणत चांगलेच फटकारलेय. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाच राज्यातील विधानसभा निवडणूक स्थगित करण्यात याव्यात, अशी याचिका काँग्रेस नेत्याने दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. यावर आज सुनावणी झाली.


निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, या याचिकेवर विचार करण्यास सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. काँग्रेस नेता जगदीश शर्मा यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने ही याचिका महत्वाची नसल्याचं सांगितले. तसेच 'तुम्ही काय मंगळावर राहाता काय? कारण कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये घट होत आहे,' असा सवाल शर्मा यांना कोर्टाला विचारला.  
 
न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने शर्मा यांच्या याचिकेवर नाराजगी व्यक्त केली. तसेच ही याचिका महत्वाची नसल्याचेही सांगितले. 'ही याचिका बिनमहत्वाची आहे. तुम्ही काय मंगळावर राहता काय? दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत आहे. तुम्ही ही याचिका माघारी घ्या अथवा आम्ही फेटाळून लावू.' न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी आपली याचिका माघारी घेतली आहे. शर्मा यांनी आपल्या याचिकामध्ये तिसरी लाट आणि ओमायक्रॉन संसर्गाचा हवाला देत पाच राज्यातील निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली होती.  


कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 टक्क्यांनी घट -
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 2 लाख 9 हजार 918 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात 18 लाख 31 हजार 268 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.  तर संसर्गाचा पॉझिटीव्हीटी दर हा 15.77 टक्के इतका झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 959 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 62 हजार 628 जणांनी कोरोनाच्या आजारावर मात केली आहे. देशात 1,66,03,96,227 जणांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.