नवी दिल्ली : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी दोन्ही राज्यातल्या पूरस्थितीची माहिती घेतली.


‘‘तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेश मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांच्याशी बोलून अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी माहिती घेतली. तसेच पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी केंद्राच्यावतीने सर्वतोपरी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिली. अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांविषयी माझ्या मनात सहानुभूती आहे.’’ असे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.





तेलंगणात जवळपास 15 लोकांचा मृत्यू


तेलंगणातील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे असलेले रस्ते आणि सखल भागात पाणी साचलं होतं. अनेक ठिकाणी घरं आणि भिंती कोसळल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. हैदराबादमध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून अनेक वाहने पाण्यात वाहून गेले. हवामान विभागाने सांगितलं की, पाऊस पुढील एक-दोन दिवस थांबणार नाही. गुरुवारी हैदराबादसह काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


आंध्र प्रदेशात गेल्या 48 तासात दहा लोकांचा मृत्यू


आंध्र प्रदेशात गेल्या 48 तासात मुसळधार पावसामुळे जवळपास दहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी जमलं आहे. पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.