लखनऊ : अपर्णा यादव यांच्यावर अखिलेश यादव सरकार किती मेहरबान झालं होतं, हे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील गोसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 2012 ते 2017 या अखिलेश सरकारच्या काळात अपर्णा यादव यांच्या गोशाळेला भरभरुन निधी देण्यात आला.

अपर्णा यादव या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांच्या भावाची म्हणजे प्रतिक यादव यांची पत्नी आहेत.

तीन वर्षात 56 टक्के निधी

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश गोसेवा आयोगाने अखिलेश सरकारच्या काळात गोशाळांना दिलेल्या निधीमधील 86 टक्के निधी अपर्णा यादव यांच्या गोशाळेला देण्यात आला.

2012 ते 2017 या काळात अखिलेश सरकारने उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या गोशाळांना एकूण 9 कोटी 66 लाख रुपयांचा निधी वाटप केला. यातील 8 कोटी 35 लाख रुपये एकट्या अपर्णा यादव यांच्या गोशाळेला देण्यात आला होता.   

कोणत्या वर्षी किती निधी?

  • 2012-13 - 49 लाख 89 हजार रुपये

  • 2013-14 - 1 कोटी 25 लाख रुपये

  • 2014-15 - 1 कोटी 41 लाख रुपये

  • 2015-16 – 2 कोटी 58 लाख रुपये

  • 2016-17 – 2 कोटी 55 लाख रुपये


अपर्णा यादव काय म्हणाल्या?

“जर कोणती संस्था काम करत असेल, तर निधी देणं गुन्हा आहे का? यात माझ्या फायद्याचं काहीही नाही. संपूर्ण माहिती घेऊनच एखाद्यावर टीका केली पाहिजे.”, असं स्पष्टीकरण अपर्णा यादव यांनी या प्रकरणावर दिलं.

दरम्यान, योगी सरकार सत्तेत आल्यानंतर अपर्णा यादव यांच्या गोशाळेला एक रुपयाही निधी देण्यात आलेला नाही.