हैदराबाद : तेलंगणामध्ये विजेच्या खांबावर चढलेल्या एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विजेच्या धक्क्यामुळे बिबट्या गतप्राण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
निझामाबाद जिल्ह्यातील मल्लराम वनक्षेत्रामध्ये हा प्रकार घडला आहे. नर बिबट्या मानवी वसाहतीत शिरल्याची माहिती स्थानिकांनी वन अधिकाऱ्यांना दिली होती. त्याच सुमारास तो विद्युत खांबावर चढला आणि त्याचा जीव गेला, असं म्हटलं जातं.
विजेच्या खांबावर हायटेन्शन वायरमध्ये बिबट्याचा मृतदेह अडकला होता. अधिकाऱ्यांनी विद्युत प्रवाह थांबवून त्याचे अवशेष खाली उतरवले.
वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा खांबावर लटकलेला बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या शिकार पकडण्यासाठी खांबावर चढला असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिकारीची शक्यता मात्र त्यांनी फेटाळून लावली आहे.