अण्णांच्या कोअर कमिटीत फूट, सरकारने उपोषण गुंडाळलं?
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2018 09:19 PM (IST)
रामलीला मैदानावर संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून पाणी पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलं.
नवी दिल्ली : जनलोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेलं अण्णा हजारे यांचं आंदोलन कुठल्याही ठोस घोषणेशिवाय सरकारनं गुंडाळलं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जे आश्वासन पत्र वाचून दाखवलं त्यात, विचार करु, केले जाईल, अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे उपोषण सरकारनं अत्यंत धूर्तपणे गुंडाळलं का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून पाणी पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलं. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची वाट बघणार, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार, असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला. मात्र अण्णा हजारेंना यापुढे उपोषण करावं लागणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या सरकारने तत्वत: मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या वाचून दाखवल्या. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं, मात्र त्यांच्या कोअर कमिटीतच फूट पडल्याचं समोर आलं आहे. कोणतंही ठोस आश्वासन न देता सरकारनं तोंडाला पान पुसल्याचा आरोप कोअर कमिटीच्या सदस्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी फूस लावत या आंदोलनात फूट पाडल्याचा दावाही कमिटीच्या सदस्यांनी केला.