नवी दिल्ली : टीव्ही शोमध्ये सहभागी झाल्यावरुन पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू वादाच्या भोवऱ्यात असताना, आता ते नव्या वादात सापडले आहेत. आयकर विभागाने सिद्धू यांचे दोन अकाऊंट सील केले आहेत.

नवज्योत सिंह सिद्धू यांनी आयकर परताव्याची बिलं देताना, अनेक गोष्टी लपवल्याचा आरोप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 2014-15 मध्ये कपड्यांवर 28 लाख रुपये खर्च केले होते. तर प्रवासावर 38 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च केली होती. याशिवाय, इंधनावर 18 लाख, कर्मचाऱ्यांचे पगार 47 लाख रुपये खर्च केले होते.

सिद्धू यांना आयकर विभागाने यासंदर्भात तीन वेळा नोटीस पाठवल्या होत्या. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने दोन अकाऊंट सील करण्याची कारवाई केली. आयकर विभागाने सील केलेल्या खात्यांमधून 58 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

दुसरीकडे सिद्धू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या मते, गेल्या दहा वर्षात आयकर परताव्याची बिलं सादर करताना कोणतीही चूक केली नाही. 2014-15 ची जी बिलं सादर केली, त्यावरील कर भरलेला आहे. तसेच, आपली अनेक देणी बाकी, असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नवज्योत सिंह सिद्धू यांच्या टीव्ही शोमध्ये सहभागी होण्यावरुन अकाली दलाने निशाणा साधला होता. पंजाब सरकारमधील मंत्र्यांकडे जनतेसाठी वेळ नाही. पण टीव्ही शोमध्ये सहभागी होण्यास वेळ आहे. त्यामुळे जनतेने आपल्या समस्या कुणासमोर मांडव्यात, असा सवाल अकाली दलाने विचारला आहे.