बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाहांनी प्रचार रॅलींचा धडका लावला आहे. पण या प्रचार रॅलीदरम्यान अमित शाहांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. कारण, अमित शाहांच्या एका प्रचार रॅलीदरम्यान भाजपच्या अनुवादकाने मोदी देश बरबाद करतील, असं भाषांतर करुन घोळ घातला आहे.


धारवाड जिल्ह्यातील दावणगिरीमधील प्रचारसभेत बोलताना अमित शाहांनी कर्नाटकातील सिद्धरामय्यांवर निशाणा साधला. अमित शाहा म्हणाले की, “कर्नाटकातील काँग्रेसने राज्यात कोणतेही विकासाचं काम केलं नाही. त्यामुळे तुम्ही मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान करा.”

पण शाहांचा कन्नड अनुवादक आणि भाजप उमेदवार प्रल्हाद जोशीने अमित शाहांच्या भाषणाचा अनुवाद करताना म्हणले की, “मोदींजवळ दलित आणि मागसवर्गीयांसाठी कोणतंही व्हिजन नाही. ते देशाला बरबाद करतील.”

दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाहांची जीभ घसरली. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना, राज्यातील येडियुरप्पा सरकार अतिशय भ्रष्ट असल्याची टिप्पणी केली होती.

तर यापूर्वी चित्रदुर्गमधील प्रचारसभेतही अशाच प्रकारच्या गोंधळाचा सामना अमित शाहांना करावा लागला. इथं अमित शाहा हिंदीत भाषण देत होते. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना प्रश्न विचारला की, तुम्ही येडियुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू इच्छिता? शाहांचा हा प्रश्न उपस्थितांना नीट समजला नाही. त्यामुळे सर्वांनी हातवारे करुन नकार दर्शवला. त्यामुळे अमित शाहांची मोठी गोची झाली.