अमरावती/गुंटूर : लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे, तत्पूर्वी प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून अपक्ष आणि लहान-सहान पक्षाच्या नेत्यांनीही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) विरुद्ध महायुती अशीच प्रमुख लढत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit Bahujan aghadi) बहुतांश मतदारसंघात उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामध्ये, राजघराण्यातील राजेही निवडणुकीच्या रणांगणात आहेत. कोल्हापूरचे शाहू छत्रपती तर साताऱ्याचे उदयनराजे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, त्यांनी आपल्या संपत्तीची विवरणपत्रही सादर केले. त्यानुसार, दोन्ही राजे अब्जाधीश असून छत्रपती शाहू महाराजांची संपत्ती 297 कोटी एवढी आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अमरावतीमधील उमेदवार देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.


लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नुकूलनाथ हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. नुकूलनाथ यांनी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता, दुसऱ्या टप्प्यातील उमेवारीसाठी दाखल केलेल्या अर्जामध्ये आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम पार्टीचे उमेदवार देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. तेलुगू देसम पार्टीचे उमेदवार पी.चंद्रशेखर असं त्याचं नाव आहे. चंद्रशेखर यांच्याकडे तब्बल 5,785 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते गुंटूर मतदारसंघातील उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.


ताफ्यात अलिशान कार


चंद्रशेखर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. भारतात एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. चंद्रशेखर यांना महागड्या गाड्यांचा शौक असून रोल्स रायस घोस्ट, मर्सिडीज बेंझ आणि टेस्ला कारही त्यांच्या ताफ्यात आहे. अमेरिकेतील अनेक फर्ममध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे. त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारी खटला नाही. दरम्यान, लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. त्यांच्याकडे ७१७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. 


चंद्रशेखर यांची पत्नीसह एकूण संपत्ती


२,४४८ कोटी एकूण संपत्ती.
२,३४३ कोटी पत्नी श्रीरत्ना कोनेरु यांच्या नावे संपत्ती.
१,१३८ कोटी व्यावसायिक कर्ज आहे.


१०१ कंपन्यांचे शेअर्स.


2019 मध्ये टीडीपीचा उमेदवार विजयी


चंद्रशेखर हे आंध्र प्रदेशच्या अमरावतीमधील गुंटूर मतदारसंघातून टीडीपीचे उमेदवार आहेत. वायएसआरसीपी पक्षाचे वेंकट रौसैय्या यांचे त्यांना आव्हान आहे. गतनिवडणुकीत या मतदारसंघातून टीडीपीच्या गल्ला जयदेव यांनी विजय मिळवला होता, तब्बल 5 लाख 87 हजारांचं मताधिक्य घेऊन त्यांनी मोठा विजय मिळवला होता. 


हेही वाचा


37 लाख 48 हजारांचं कर्ज, विखेंविरुद्ध लढणारे निलेश लंके यांची संपत्ती किती?