हैदराबाद : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर संपूर्ण देशात वातावरण तापलं असताना, चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे दोन रुपये कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी घेतला.


पेट्रोल-डिझेलवरील दोन रुपयांची कपात उद्या (11 सप्टेंबर) सकाळपासून आंध्र प्रदेशमध्ये लागू करण्यात येईल. त्यामुळे उद्यापासून आंध्रमध्ये पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त असेल.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कालच (9 सप्टेंबर) पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट 4 टक्क्यांनी कमी केला होता. त्यानंतर राजस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 2 रुपये ते 2.5 रुपये प्रति लिटर कपात झाली. मात्र, वसुंधरा राजे यांचा इंधन दर कपातीचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या करामध्ये कपात अशक्य असल्याचे अर्थ मंत्रालयाने आजच स्पष्ट केले आहे. जर कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढले, तर यावर विचार होईल, असेही अर्थ मंत्रालयाने सांगितले. शिवाय, जर एक्साईज ड्युटी घटवली, तर त्याचा परिणाम विकासावर होण्याची शक्यता आहे, असा दावा अर्थ मंत्रालयाने केला आहे.

पेट्रोल आणि डिझेल जीएसटीअंतर्गात आणल्यावरही दरांवर फारसा फरक पडणार नाही आणि राज्यांची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली नाहीय. त्यामुळे सध्या पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या शुक्रवारी म्हटले होते की, पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणणं गरजेचं आहे. मात्र मोदी सरकारमधीलच दोन मंत्र्यांची मतं परस्पर विरोधी असल्याचे दिसून येते आहे.

तूर्तास, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमधील राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातील जनतेला इंधनाचे दर कमी करुन काही प्रमाणात दिलासा दिला आहे.