Ragging Case : इंदूर येथील (Indore) मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग गॅंगचा (Ragging Case) पर्दाफाश करणारी 24 वर्षीय शालिनी चौहान (Shalini Chauhan) इंदूर पोलिसात महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. या कामगिरीमुळे तिचे पोलीस विभागातही (Lady Police Constable)  त्यांचे कौतुक होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या..


महिला पोलीस हवालदार विद्यार्थिनी म्हणून महाविद्यालयात दाखल
मध्य प्रदेशातील इंदूर येथील महात्मा गांधी स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर, एक महिला पोलीस हवालदार विद्यार्थिनी म्हणून महाविद्यालयात दाखल झाली. त्यावेळी तिने रॅगिंगचे आरोपी पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शालिनी चौहान असे या महिला पोलिसाचे नाव असून तिचे वय अवघे 24 वर्षे आहे. आरोपी विद्यार्थ्यांना कोणतीही शंका न घेता शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले होते.


रॅगिंगच्या अनेक घटना, तपासासाठी गुप्तहेर पथक
या वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याची घटना समोर आली होती, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हेल्पलाइनवर तक्रारही केली होती. या प्रकरणाची दखल घेत संयोगितागंज पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी गुप्तहेर पथक तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये शालिनी चौहान यांचा समावेश होता.


महिला पोलीस शालिनीने आरोपीला कसे पकडले?
या प्रकरणाचे नेतृत्व एसएचओ तहजीब काझी आणि उपनिरीक्षक सत्यजित चौहान करत होते. आरोपी विद्यार्थ्यांची ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांना भेटणे आणि त्यांचे वर्तन जाणून घेणे महत्त्वाचे होते. या कामासाठी शालिनी चौहानची निवड करण्यात आली. तिने हे काम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलं. विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्यासाठी ती कॅन्टीनमध्ये बराच वेळ घालवत असे, कनिष्ठ विद्यार्थ्यांशी खूप संवाद साधत असे. काही वेळातच तिने वरिष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून रॅगिंगसारख्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखले. आतापर्यंत 10 आरोपींची ओळख पटली असून 6 विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली आहे. शालिनी सर्वांशी हसतमुखाने बोलत असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. या कारणास्तव, तिला हे प्रकरण त्याच्या निष्कर्षापर्यंत नेण्यात यश आले.


अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल 
अनेकवेळा विद्यार्थी रॅगिंगच्या भीतीमुळे महाविद्यालय अर्ध्यातच सोडतात, काहीवेळा विद्यार्थी आत्महत्यासारखे भयंकर पाऊलही उचलतात. या कारवाईबाबत एका विद्यार्थ्याने सांगितले की, या महिला पोलिसाने ज्या पद्धतीने रॅगिंगच्या आरोपींवर ही कारवाई केली आहे, तो अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाकडून रॅगिंग करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


वरिष्ठांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत हेलिकॉप्टरने रुग्णालयात हलवलं, मात्र हृदयविकाराचा झटका आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं अखेर निधन