India-China Clash : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय (India) आणि चिनी (China) सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत तिन्ही लष्कर प्रमुख तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांना घटनेची सविस्तर माहिती देतील. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, तिन्ही लष्कर प्रमुख, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ होण्याचीही शक्यता आहे.


 


9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या सैन्याचा एक गट सीमा रेषेजवळ दिसला होता. त्यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी चिनी सैन्याला माघार घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चकमक झाल्यानंतर लगेचच दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या भागात परतले. चिनी सैनिकांनी अचानक केलेल्या या हल्ल्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून 20 सैनिक जखमी झाले, तर जखमी चिनी सैनिकांची संख्या दुपटीने अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.


 


संसदेत गदारोळ होण्याची शक्यता
या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे, संसद हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर संसदेच्या रणनीतीबाबत पंतप्रधान मोदींसोबत ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक होणार आहे. तसेच काँग्रेसचे अनेक नेते त्यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे बोलले जात आहे.



भारताच्या स्थानिक कमांडरची चीनच्या कमांडरसोबत बैठक
या घटनेनंतर, भारतीय स्थानिक कमांडरची चिनी कमांडरसोबत बैठक पार पडली. यावेळी दोन्ही देशांकडून शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, तवांगमध्ये LAC चे काही भाग आहेत, जिथे दोन्ही बाजू आपला दावा करतात आणि दोन्ही देशांचे सैनिक येथे गस्त घालतात. हा ट्रेंड 2006 पासून सुरू आहे.


"राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत, त्यावर राजकारण करणार नाही"


काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल ट्विट केले होते की, "पुन्हा एकदा भारताच्या सैनिकांना चीनने चिथावणी दिली आहे. आमचे सैनिक धैर्याने लढले आणि काही सैनिक जखमीही झाले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही एक राष्ट्र म्हणून एकत्र आहोत, त्यावर राजकारण करणार नाही. पण LAC वर चीनची आक्रमकता आणि एप्रिल 2020 पासून सुरू असलेल्या कुरापतीबाबत मोदी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. ते म्हणाले, “सरकारने या विषयावर संसदेत चर्चा करून देशाला विश्वासात घेतले पाहिजे. आमच्या जवानांच्या शौर्यासाठी आणि बलिदानासाठी आम्ही ऋणी आहोत"