Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काल किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद झाले होते. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील चक टापर भागात शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली. आज सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.


किश्तवाडच्या चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत.


कठुआमध्ये दोन दहशतवादी ठार, शस्त्रे जप्त


याआधी कठुआच्या खंडारामध्येही लष्कराचे ऑपरेशन झाले होते. येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.11 सप्टेंबर रोजी उधमपूरमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. लष्कराने सांगितले की, लष्कराच्या फर्स्ट पॅरा सैनिकांना उधमपूरच्या खांद्रा टॉपच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुमारे चार तास चाललेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.


आज डोडामध्ये पंतप्रधानांची सभा


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (14 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे मेगा रॅलीला संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ त्यांच्या निवडणूक प्रचाराची ही सुरुवात असेल. चिनाब व्हॅली, डोडा, किश्तवाड आणि रामबन या तीन जिल्ह्यांतील 8 विधानसभा जागांच्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी मतांचे आवाहन करणार आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी तिन्ही ठिकाणी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांवर एकूण तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबरला तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.


जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या 6 दिवस आधी 12 सप्टेंबर रोजी सुरक्षा दलांनी कुपवाडा, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांचे 3 लपलेले ठिकाण शोधून काढले. कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये एका मोठ्या झाडाच्या मुळाशी खड्डा खणून दहशतवाद्यांनी हे अड्डे तयार केले होते. मुळांची जागा 5 ते 6 फूट होती. येथून AK-47 ची 100 हून अधिक काडतुसे, 20 हातबॉम्ब आणि 10 छोटी रॉकेट सापडली आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या