नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाचं सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विमानासंदर्भात नवीन खुलासा समोर आला आहे. या विमानातील एअरमॅन रघुवीर वर्मा यांचा फोन सुरु असून, त्यावर गेल्या दोन दिवसांपासून रिंग जात असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या फोनला रिंग जात असली तरी कोणीही फोन उचलत नाही आणि फोन स्विच ऑफ होत असल्याचं नातेवाईकांनी स्पष्ट केलं आहे.
भारतीय हवाई दलाचे AN-32 हे मालवाहू विमान 22 जुलै रोजी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 16 मिनिटांत बेपत्ता झालं होतं. या विमानातून 29 जण प्रवास करत होते. 17 जहाजं, 23 विमानं आणि एक पाणबुडी तसंच उपग्रहाच्या साहाय्याने बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात विमानाचे काही अवशेष सापडल्याची माहिती समोर आली होती.
रघुवीर वर्मा यांचा फोन सुरु असल्याचे कळाल्यानंतर हवाईदलाने तपासाची दिशा बदलली आहे. रघुवीर यांचं मेसेंजर अॅपवरील लास्ट सीन 26 जुलै दिसत असल्याची माहितीही नातेवाईकांनी दिली. रघुवीर वर्मा काही दिवसांपासून राजस्थानमध्ये तैनात होते आणि सुट्टीसाठी घरी परतत होते.
एएन 32 विमानं 1984 साली रशियाकडून खरेदी करण्यात आली होती. यातील दोन विमानांचा 1986 मध्ये अरबी समुद्र आणि काश्मीर खोऱ्यात कोसळून अपघात झाला होती. सध्या हवाईदलाकडे 101 एएन 32 विमानं आहेत.