गुजरातच्या उत्तर भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील डेअरी उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.
पुरामुळे बनासकांठ परिसराला मोठा फटका बसला असून, याच परिसरात अमूल डेअरीशी संबंधित 18 सहकारी दूध संकलन केंद्रांपैकी सर्वात मोठं दूध संकलन केंद्र आहे. या केंद्रावर पुरामुळे दूध संकलनात मोठी घट झाली आहे. बनासकांठमधील दूध संकलन केंद्रावर दररोज 40 लाख लिटर दूध संकलन होतं. पण पूरपरिस्थितीमुळे या केंद्रावर सध्या 10 लाख लिटर दूध संकलित होत आहे.
याशिवाय पुरामुळे रस्त्यांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध केंद्रांवर जाऊन दूध संकलित करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दूध संकलन कमी झाल्याने, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे एकट्या अमूल फेडरेशनला पुरामुळे 70 कोटीचं नुकसान सहन करावं लागलं आहे.
याशिवाय पुरामुळे पशुधनाचंही मोठं नुकसान झालं आहे. पुराच्या पाण्यामुळे गाय, म्हशींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आगामी काळात दूध संकलनामधील तफावत भरुन काढण्यात मोठा वेळ लागणार आहे.