नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांच्या बैठकीला आज राष्ट्रपती नियुक्त कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली.

संभाजीराजे हे राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार आहेत. पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणं त्यांना बंधनकारक नसतं. संभाजीराजे हे आधी राष्ट्रवादी पक्षात होते, शिवाय ते राजघराण्यातले असल्यानं राष्ट्रपतींद्वारे निवड झाल्यानंतर ते काय करणार याबद्दल उत्सुकता होती. मात्र त्यांनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व अखेर स्वीकारलेलं आहे.

आजच्या मीटिंगला भाजप खासदारांसोबत तेही 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहचले. या उपस्थितीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, “मी केवळ संसदेतच भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलंय. अधिवेशन काळात दर मंगळवारी भाजपची संसदीय पक्षाची जी बैठक होते, त्याला मी जात नाही. तसं बंधनही माझ्यावर नाही. मागच्या अधिवेशनातही आपण पंतप्रधानांनी बोलावलेल्या भाजप खासदारांच्या बैठकीला हजर होतो”.

छत्रपती संभाजीराजे यांच्याप्रमाणे डॉ. नरेंद्र जाधव हेही राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार आहेत. पण त्यांनी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलेलं नाही.

छत्रपती संभाजीराजे हे भाजप खासदारांच्या मांडीला मांडी लावून मोदींच्या दरबारात पोहचल्याची आज दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

सहयोगी सदस्यत्व स्वीकारून संभाजीराजेंनी आपल्या मंत्रिपदाचा मार्गही मोकळा ठेवला आहे की काय असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.

संभाजीराजे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. शिवाय महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून मराठा मोर्चांचं वादळ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंना संधी देण्याचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. सहयोगी सदस्यत्व स्वीकारुन संभाजीराजेंनी एक पाऊल पुढे टाकलेलंच आहे, आता मंत्रिपद स्वीकारुन ते भाजपचा शिक्का स्वत:वर लावून घेणार का याची उत्सुकता आहे.

संभाजीराजे काय म्हणाले?

“संभाजीराजे हे राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. खासदारकी स्वीकारल्यावर त्यांना  संसदेतलं पक्षाचं सदस्यत्व स्वीकारायचं की नाही याचा पर्याय खुला असतो . त्यामुळे संभाजीराजे काय करणार याची उत्सुकता होती.

आजच्या बैठकीला त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांना विचारलं असता, संभाजीराजे म्हणाले मी केवळ संसदेतच भाजपचं सदस्यत्व ( सहयोगी) स्वीकारलं आहे. दर मंगळवारी अधिवेशन काळात जी भाजपची संसदीय बैठक होते त्याला मी जात नाही, तसं बंधनही माझ्यावर नाही.

मी खासदारकी कुणाकडे मागायला गेलो नव्हतो, पण ज्या मोदींनी आपली निवड केलीय त्यांच्याप्रती आदर म्हणून त्यांनी बोलावलेल्या या बैठकीला हजर राहिलो. मागच्या अधिवेशनातही पंतप्रधानांनी बोलावलेल्या अशा बैठकीला उपस्थित होतो”, असं संभाजीराजे म्हणाले.

संबंधित बातम्या

पवारांच्या त्या वक्तव्याबाबत संभाजीराजे म्हणतात....


मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर 


मी कधीही सहज बोलत नाही : शरद पवार