Amritpal Singh Arrested : फरारी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह (Amritpal Singh) याला पंजाब पोलिसांनी (Punjab Police) अटक केली असल्याचा दावा 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या वकिलाने दिली आहे. 'वारिस पंजाब दे' संघटनेचे वकील इमान सिंह खारा यांनी रविवारी (19 मार्च) दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शाहकोट पोलीस ठाण्यात अटक केल्याचा दावा वकीलाने केला आहे. मात्र खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु असल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे.
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहला अटक : वकीलाचा दावा
अमृतपाल सिंह अद्याप फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. मात्र, पोलिसांच्या दाव्याच्या विरोधात वकील इमान सिंह खारा यांनी सांगितलं की, अमृतपाल सिंहला शाहकोट पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस त्याचं एन्काऊंटर करु शकतात, असाही वकीलाचा आरोप आहे.
अमृतपालच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु : पंजाब पोलीस
खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलं. रविवारी (19 मार्च) पंजाब पोलिसांनी अमृतपालला जलंधर परिसरात शोधमोहिम राबवली असून ही मोहीम सुरूच आहे. पोलिसांनी शनिवारी म्हणजेच 18 मार्चपासून अमृतपाल सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे. अमृतपाल सिंह अद्यापही फरार असल्याचं पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे.
Who is Amritpal Singh : कोण आहे अमृतपाल सिंह?
'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह यांचा जन्म 1993 मध्ये अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावात झाला. अमृतपाल तरसेम सिंह यांचा मुलगा आहे. अमृतपाल 2012 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला होता. तो 10 वर्षे म्हणजे 2022 पर्यंत दुबईत राहिला. यादरम्यान त्याचे केस आणि चेहऱ्यावर दाढी वाढवलेली नव्हती.
2022 मध्ये दुबईहून भारतात परतला
अमृतपाल सिंहच्या काकांचा दुबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. शेतकरी आंदोलनादरम्यान अमृतपाल दीप सिद्धूसोबत दिल्ली सीमेवर आला होता. तो ऑगस्ट 2022 मध्ये दुबईहून भारतात आला होता. त्याने सप्टेंबर 2022 मध्ये पुन्हा केस ठेवून दस्तरबंदी केली आणि मोगाच्या रोडे गावात दस्तरबंदीचा मोठा कार्यक्रम केला. त्यानंतर तो दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख बनला. अमृतपालने पंजाबमध्ये धार्मिक यात्राही सुरू केली. खलिस्तानी चळवळीत ग्रामीण तरुणांना सामील करण्यास सुरुवात केली.
अटकेची पार्श्वभूमी
15 फेब्रुवारी 2023 रोजी अमृतपाल सिंहचे वरिंदर सिंहसोबत एका फेसबुक पोस्टवरून भांडण झालं होतं. 16 फेब्रुवारी 2023 रोजी अजनाला येथे त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर वरिंदर सिंह यांचं अपहरण करून त्यांच्या छळ केल्याचा आरोप होता. 16 फेब्रुवारी रोजी अमृतपालने अजनाळा पोलिसांना धमकी देत पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा अल्टिमेटम दिला होता.
यानंतर अमृतपाल 19 फेब्रुवारीला मोगा येथे दीप सिद्धूच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पोहोचला आणि मंचावरून खलिस्तानी घोषणाबाजी केली. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरोधात अपशब्द बरळून पोलिसांना धमकी दिली.