Punjab Amritpal Singh Search Operation : पंजाबमध्ये (Punjab) खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' (Waris Punjab De) संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या (Amritpal Singh) अटकेसाठी पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंहच्या 78 साथीदारांना अटक केली होती. NIA ने अमृतपालचा फायनॅन्सर दलजित सिंह कलसीसह चार साथीदारांना अटक केली आहे. या आरोपींना डिब्रुगडला नेण्यात येणार आहे.
अमृतपाल सिंहला अटक करण्यासाठी पोलिसांची शोधमोहिम
खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपालचा शोध रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्याला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांनी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी अमृतपालला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याची कार नकोदर येथे उभी असल्याचे आढळून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालचा मोबाईल फोनही याच वाहनात सापडला आहे.
20 मार्चपर्यंत इंटरनेट बंद राहणार
पंजाब पोलिसांची वारिस पंजाबचे प्रमुख अमृतपाल सिंह यांच्याविरोधात रविवारीही शोध मोहीम सुरूच आहे. आता पंजाबमध्ये 20 मार्चपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. पंजाबमध्ये रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता इंटरनेट बंदी आणखी वाढवण्यात आली आहे.
पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी
जालंधरचे सीपी केएस चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार की, पोलिसांनी अमृतपाल सिंहचा 20-25 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला, त्यादरम्यान तो पळून जाण्यात यशस्वी झाला. शस्त्रांसह दोन कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अमृतपालचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
अमृतपालचे साथीदार एनआयएच्या ताब्यात
अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी पंजाब पोलिसांची जोरदार कारवाई सुरू आहे. त्याच्या साथीदारांवर पोलिसांकडून सातत्याने कडक कारवाई करण्यात येत आहेत. अमृतपालच्या 78 साथीदारांना अटक करण्यात आली होती. आता NIA ने अमृतपालच्या चार साथीदारांना अटक केली आहे.
कोण आहे अमृतपाल सिंह?
खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह हा खलिस्तानी चळवळीच्या जर्नेलसिंह भिंद्रनवालेचा (Jarnail Singh Bhindranwale) समर्थक मानला जातो. 'वारीस पंजाब दे' ही संघटना अभिनेता संदीप सिंह उर्फ दीप सिद्धूने स्थापन केली होती. अमृतपाल सिंहला सप्टेंबरमध्ये या संस्थेचे प्रमुख बनवण्यात आलं. 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता. खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहने (Amritpal Singh) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना थेट धमकी दिली होती. जेव्हा लोक हिंदू राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही, असं अमृतपाल सिंह म्हणाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :