Amarnath Yatra 2022 : 30 जूनपासून सुरु होत असलेल्या अमरनाथ यात्रेला यंदा विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या यात्रेसाठी तीन लाख यात्रेकरुंनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी देशभरातील 566 केंद्रांवर करण्यात आली आहे. यंदा आठ लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर यात्रा होत असल्याने यंदा यात्रेकरूंची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली जात आहे. 


8 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता
यंदा अमरनाथ यात्रेसाठी जास्तीत जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी 2018 मध्ये यात्रेसाठी 2.85 लाख भाविक आले होते. 2011 मध्ये सर्वाधिक 6.35 लाख यात्रेकरू आले होते. तर यंदाच्या वर्षी यात्रेसाठी आठ लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी येऊ शकतात, असा जम्मू-काश्मीर प्रशासनाचा अंदाज आहे.


अतिरिक्त पाच हजार सैनिकांचा बंदोबस्त
जम्मूमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी अतिरिक्त पाच हजार सैनिकांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा कारवायांना आळा घालण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. 43 दिवसांच्या अमरनाथ यात्रेला 30 जूनपासून सुरूवात होत आहे. कोरोनामुळे अमरनाथ यात्रा दोन वर्ष रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 


कडेकोट सुरक्षा व्यवस्था
कोरोना महामारीमुळे ही यात्रा तीन वर्ष रद्द झाली होती. यात्रेसाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली असून प्रशासन सतर्क आहे. त्यासाठी जवानांकडून परिसरात पाळत ठेवली जात आहे. ड्रोनच्या निगराणीची व्यवस्था करण्यात आली आहे.


यात्रेकरूंची सोय लक्षात घेता प्रशासन त्यांच्या मुक्काम, भोजन आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच सहा रुग्णालयं उभारण्यात आली आहेत. पहलगाम, बालटाल आणि सोनमर्ग येथेही कोविड केअर रुग्णालयं उभारण्यात आली आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या