Drone in Kanachak Area : पाकिस्तानकडून (Pakistan) कुरघोड्या करणं सुरुच आहे. कधी काश्मीर (Kashmir), कधी राजस्थान तर कधी पंजाब भागात ड्रोन पाठवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरुच आहे. आज पुन्हा पाकिस्तानचा असाच नापाक डाव सीमा सुरक्षा दलने उधळून लावला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून काश्मीर भागात ड्रोनचा वापर करत टिफिन बॉक्समधून टाईम बॉम्ब पाठवण्यात आले होते. पण बीएसएफने हा डाव उधळत बॉम्ब निष्क्रिय केले आहेत.
टिफिन बॉक्समध्ये टायमर लावलेले आयईडी बॉम्ब
सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कानाचक परिसरात बीएसएफला (BSF) ड्रोन दिसले. जवानांनी त्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर लगेचच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ड्रोनला जोडलेले पेलोडमध्ये मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक केलेले तीन चुंबकीय आयईडी बॉम्ब होते. या बॉम्बमध्ये टाइमर वेगवेगळ्या वेळेसाठी सेट केला गेला होता. हे आयईडी बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा ड्रोन हवेत सुमारे 800 मीटर उंचीवर उडत होता. याआधी कठुआ जिल्ह्यातही बीएसएफनं एक ड्रोन पाडलं होतं. त्यामध्ये स्फोटकं सदृश्य वस्तू आढळली होती. स्थानिकांना हे संशयित ड्रोन दिसलं होतं.
अमरनाथ यात्रेआधी सैन्य दल सतर्क
सीमेपलीकडून सातत्याने ड्रोनच्या हालचाली होत असल्याने पोलिसांची शोध पथकं परिसरात तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीर हिमालयातील प्रसिद्ध अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. येथे 30 जूनपासून 43 दिवसांची अमरनाथ यात्रा दोन मार्गांनी सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या