दिल्ली : इंडिया गेट (India Gate) लॉनवरील अमर जवान ज्योती (Amar Jawan Jyoti) ही आज (शुक्रवार) नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) मशालीमध्ये विलीन केली जाणार आहे.
आज दुपारी साढे तीन वाजता एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात अमर जवान ज्योतीला नॅशनल वॉर मेमोरियलच्या मशालीमध्ये विलीन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख एअर मार्शल बालबध्रा राधा कृष्ण हे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन मशालींची देखभाल करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे, सूत्रांनी सांगितले.
देशातील हुतात्म्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आलेले असल्याने इंडिया गेटवर वेगळी ज्योत का पेटवायची असा युक्तिवाद याआधी झाला होता, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली. नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये सर्व भारतीय संरक्षण कर्मचार्यांची नावे आहेत ज्यांनी 1947-48 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धापासून ते गलवान खोऱ्यातील चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये आपले प्राण गमावले. दहशतवादविरोधी लढाईमध्ये प्राण गमावलेल्या जवानांची नावेही स्मारकाच्या भिंतींवर लावण्यात आली आहेत.
नॅशनल वॉर मेमोरियल हे 40 एकरांवर बांधले गेले आहे. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यासाठी 176 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. 25 फेब्रुवारी 2019 रोजी या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- China Artificial Moon : सूर्यानंतर आता चंद्र देखील मेड इन चायना; चीननं तयार केला कृत्रिम चंद्र
- Instagram Paid Subscriptions : इंस्टाग्राम आणणार नवं फिचर; रिल्स, व्हिडीओ बनवण्यासाठी सबस्क्रिप्शन
- पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha