Shri Krishan Janm Bhoomi Case : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादात हिंदू पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुनावणी सुरू ठेवण्यास असलेला मुस्लिम पक्षाचा आक्षेप अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. अलाहाबाद न्यायालयाने मंदिर-मशीद वादात सुरू असलेले खटले कायम ठेवण्याबाबत हा निर्णय दिला आहे. 


हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 15 खटल्यांवर उच्च न्यायालयाने अंतरिम निकाल दिला. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, हिंदू बाजूची सर्व प्रकरणे सुनावणीस पात्र आहेत. यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि शाही इदगाह मस्जिद समितीने हिंदू बाजूच्या सर्व 15 याचिका फेटाळण्याचा युक्तिवाद केला होता.
प्लेसेस ऑफ़ व्हरशिप अॅक्ट, लिमिटेशन अॅक्ट, वक्फ अॅक्ट आणि स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट या कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचं सांगत हिंदू पक्षकारांच्या 15 याचिका फेटाळण्यात याव्यात अशी मागणी केली होती. 


या प्रकरणी आता पुढील सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे हिंदू बाजूच्या याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयात सुरू राहणार आहे. उच्च न्यायालयाने ही प्रकरणे सुनावणीस योग्य मानली आहेत. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला. 


या 15 याचिकांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने 31 मे रोजी निकाल राखून ठेवला होता. पुढील सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे. 


हिंदू पक्षाचे आशुतोष पांडे काय म्हणाले?


या प्रकरणी हिंदू पक्षाचे आशुतोष पांडे म्हणाले की, आज 355 वर्षांनंतर सनातन धर्म, सनातन संस्कृती, हिंदू समाज आणि त्या संतांचा विजय झाला आहे. कृष्णजन्मभूमीच्या विरोधात मुस्लिम पक्ष कोणताही पुरावा सादर करू शकला नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे माननीय न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. हा सनातन संस्कृतीच्या विजयाचा निर्णय आहे. 1947 मध्ये श्री कृष्ण जन्मस्थानाची मालकी ही ट्रस्टकडे होती. आजही ट्रस्टकडेच कृष्ण जन्मस्थानाची मालकी आहे. औरंगजेबाने हिंदू-मुस्लिमांमध्ये लढण्यासाठी सुरू केलेली मोहीम आज संपुष्टात येत आहे.


 




ही बातमी वाचा: