मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात वर्गणी गोळा केली जात आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने या मोहिमेत सहभाग घेतला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अक्षयने स्वत: दान दिले असून असून नागरिकांनाही राम मंदिर उभारणीत योगदान देण्याचं आवाहन केलं आहे.
अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर करत या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन लोकांना केलं आहे. अक्षयने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिलं की, अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु झाले आहे, याचा खूप आनंद आहे. आता यामध्ये आपण योगदान देण्याची वेळ आली आहे. मी सुरुवात केली आहे, तुम्हीही या मोहिमेत सहभागी व्हा. जय सियाराम.
देशभरातल्या 13 कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचं लक्ष
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने या वर्गणी अभियानाला सुरुवात केली आहे. हे अभियाने पुढचे दिड महिना चालेल असं सांगण्यात येतंय. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातल्या 13 कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचं लक्ष आहे. या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या वर्गणीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.
अयोध्येतील राममंदिरासाठी वर्गणी की राजकीय प्रचार? भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने
दोन हजारापेक्षा जास्त वर्गणी देणाऱ्या लोकांसाठी वेगळी पावती देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून संबंधित देणगीदारांना आयकरापासून सूट मिळेल असे ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितलं की राष्ट्रपतींच्या हस्ते या अभियानाची सुरवात केल्यानंतर आता उपराष्ट्रपतींचीही भेट घेण्यात येणार आहे. हे अभियान पंतप्रधानांपासून ते देशातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राममंदिर उभारणीसाठी 10 अब्ज रुपयांचा निधी गोळा करणार, विश्व हिंदू परिषदेचा संकल्प
अयोध्येतील राममंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यानंतर आता राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी अभियानाला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) 10 अब्ज रुपये जमा करण्याचा विचार विश्वहिंदू परिषदेने या आधीच व्यक्त केला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर 1000 वर्ष टिकावे या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे अशीही माहिती मिळते.