मुंबई : अयोध्येतील राममंदिर आणि हिंदुत्वावरुन पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद यासाठी एक मोहिम राबविणार आहे. याची सुरुवात येत्या मकरसंक्रांतीपासून होणार आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.


अयोध्येत उभारलं जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्ताची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घराघरात जाणार आहेत", अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि रामजन्म भूमी तीर्थस्थानचे सचिव चंपत राय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.


हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान : राऊत
'अयोध्येचा राजा प्रभू श्री राम यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलंय. व न्यायालयाच्या आदेशानं मंदिर निर्माण होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालंय. तरीही अयोध्याच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे,' अशी टीका राऊत यांनी केली आहे.


चार लाख लोक कोणाच्या प्रचारासाठी पाठवत आहात : राऊत
'चार लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार हे लोकांना मान्य नाही. हे चार लाख लोक कोणाच्या प्रचारासाठी पाठवत आहेत?, असा सवाल संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. तसंच, राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपवावं,' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 'रामाच्या नावानं बँकेत खातं उघडलं आहे त्यात पुरेसा निधी येतो. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळ्यात आधी दिला आहे, असं नमूद करतानाच, राजकीय प्रचारासाठी असं करणं हा हजारो कारसेवकांचा अपमान आहे,' अशी टीकाही केली आहे.




शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी : आशिष शेलार


“भाजपसाठी हा मुद्दा राजकीय नाही. संजय राऊत आणि शिवसेना या दोघांनाही राम मंदिराच्या कामात अडंग आणण्याची भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, पायाभरणी कार्यक्रमही ई पद्धतीने घेण्याची मागणी होती, आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छेने येणाऱ्या निधीतून राम मंदिराचं काम होतंय. आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा, या पद्धतीची राम मंदिर विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.


Sanjay Raut | हा तर अयोध्येच्या राजाचा अपमान : संजय राऊत