जयपूर : भारतीय जनता पक्षाचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष मदनलाल सैनी यांनी मुघल शासक अकबराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. सैनी म्हणाले की, ठअकबर महिलांच्या वेशात मीनाबाजारात जात होता. तिथल्या महिलांची छेड काढायचा." सैनी यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

गुरुवारी (06 जून) मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची जयंती देशभरात साजरी केली. जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयातही महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर सैनी यांनी माध्यमांशी संवाद साधला.


सैनी म्हणाले की, "कोणत्याही व्यक्तीची महानता त्याच्या चरित्रावरुन समजते. अकबर महिलांच्या वेशात मीना बाजारात जायचा. तिथे जाऊन महिलांसोबत दुष्कर्म करायचा". सैनी म्हणाले की, "दुष्कर्म म्हणजे छेडछाड". दरम्यान काँग्रेसने सैनी यांच्या वक्तव्याबाबत राग व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या अर्चना शर्मा याबाबत म्हणाल्या की, त्यांनी (सैनी) ज्या प्रकारची भावना व्यक्त केली आहे, ती अत्यंत निंदनीय आहे.