नवी दिल्ली : देशातल्या सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी 30 जूलै रोजी निवृत्ती घेणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा मुलगा रिशद हा विप्रोची कमान सांभाळणार आहे. वयाच्या 21 व्या वर्षी या कंपनीची जबाबदारी अझीम यांच्या खांद्यावर पडली होती. गेल्या 53 वर्षात प्रेमजी यांनी विप्रोचा व्यवसाय 7 कोटींवरुन 83 हजार कोटी रुपयांवर नेला आहे.


कधी काळी वणस्पती तेल आणि साबणांची निर्मिती करणारी विप्रो ही कंपनी आज आयटी, एफएमसीजी क्षेत्रातली दिग्गज कंपनी मानली जाते. 1970 साली प्रेमजी यांनी साबण आणि तेल सोडून सॉफ्टवेअरकडे स्वतःचे लक्ष वळवले. त्यानंतर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहीलेच नही.

विप्रोने गुरुवारी जाहीर केले की, प्रेमजी 30 जूलै रोजी कार्यकारी संचालक पदावरुन निवृत्ती घेणार आहेत. दरम्यान, 31 जुलैपासून पुढील पाच वर्षांसाठी ते कंपनीमध्ये गैर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील.

1966 मध्ये प्रेमजी यांच्या वडिलांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यावेळी 21 वर्षांचे प्रेमजी स्टेनफोर्ड विद्यापीठामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग करत होते. परंतु वडिलांच्या मृत्यूमुळे प्रेमजी शिक्षण अर्थवट सोडून भारतात आले. सुरुवातीला त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी वडिलांचा व्यवसाय बंद करुन घर सांभाळण्यासाठी नोकरी करण्याचा सल्ला दिला. परंतु प्रेमजी यांनी सर्वांना चुकीचे सिद्ध केले.

प्रेमजी यांनी वडिलांचा व्यवसाय सांभाळायला घेतला. व्यवसायात सातत्याने यशस्वी होत गेले. योग्य वेळी त्यांनी आयटी क्षेत्रात हात आजमावला आणि देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी उभारली. 30 वर्षानंतर प्रेमजी यांनी पुन्हा एकदा स्टेनफोर्ट विद्यापीठात जाऊन इंजिनियरिंग पूर्ण केले.