नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. ते 82 वर्षाचे होते. अजित सिंह यांना 20 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री अचानक तब्बेत बिघडल्याने त्यांना गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख असलेले अजित सिंह हे पश्चिम उत्तर प्रदेशचे महत्वाचे नेते होते. त्यांना फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. अजित सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार जयंत चौधरी यांनी त्यांच्या निधनाची वार्ता दिली आहे. 


 






राजकीय कारकीर्द
अजित सिंह हे देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचे सुपुत्र होते. उत्तर प्रदेश मधील बागपत या लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल सात वेळा संसदेत निवडून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी नागरी विमान उड्डाणमंत्री म्हणूनही काम केलं आहे. 


अजित सिंह यांचा जन्म 1939 सालचा. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अजित सिंह यांनी अमेरिकेत कंप्युटर इंडस्ट्रीजमध्ये 15 वर्षे नोकरी केली. 1986 साली ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. व्हीपी सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उद्योगमंत्री म्हणूनही काम केलं. नंतर त्यांनी पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अन्न व प्रशासन मंत्री म्हणून काम केलं. 


राष्ट्रीय लोक दलाची स्थापना केल्यानंतर अजित सिंहांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री म्हणून कारभार पाहिला. मे 2003 पर्यंत त्यांचा पक्ष एनडीएचा सहयोगी राहिला. नंतरच्या काळात त्यांनी युपीएचा हात पकडला आणि उत्तर प्रदेशमध्ये एकत्रित निवडणूक लढवली. 



महत्वाच्या बातम्या ;