Air Travel To Be Costly : तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर तुमच्या खिसाला कात्री बसू शकते. कारण, विमान प्रवास आता महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा हवाई इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएफच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या दरवाढीनंतर विमान इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. 2022 मध्ये विमान इंधनाच्या किमती 10 व्यांदा वाढल्या आहेत.
5 टक्क्यांनी वाढ
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने विमानाच्या इंधनाच्या दरावरही परिणाम झाला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानीत एटीएफच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. देशाच्या राजधानीत ATF ची किंमत 123,039.71 रुपये प्रति किलोलिटर म्हणजेच 123 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.
15 दिवसांनी किमतींचा आढावा
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला विमान इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. यावर्षी 1 जानेवारीपासून हवाई इंधन जवळपास 62 टक्क्यांनी महागले आहे.
कोलकाता आणि मुंबईत किंमत किती आहे?
मुंबईत एटीएफची किंमत आता 121,847.11 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. तो कोलकात्यात 127,854.60 रुपये आणि चेन्नईमध्ये 127,286 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.
महागड्या हवाई इंधनाचा फटका विमान उद्योगाला
महागड्या कच्च्या तेलामुळे गेल्या चार महिन्यांत हवाई इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा फटका देशातील विमान उद्योगाला सहन करावा लागू शकतो. महागड्या हवाई इंधनामुळे विमान कंपन्या भाडे वाढवत असून, त्याचा परिणाम विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर होत आहे. रेटिंग एजन्सी ICRA ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एटीएफच्या वाढत्या किमतींचा देशाच्या विमान उद्योगावर परिणाम होऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या