Air India New Logo : एअर इंडिया (Air India) या कंपनीचा सध्या रीब्रँडिंग इव्हेंट सुरु आहे. या कार्यक्रमात कंपनीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सध्या एअर इंडियाचा लोगो असलेल्या महाराजा शुभंकर याच्यावरील कामाचा ताण कमी करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. वृत्तानुसार, महाराजा शुभंकर हा एअर इंडियाच्या प्रीमियम क्लासेसमध्ये आणि विमानतळाच्या लाउंजमध्ये असणार आहे. पिळदार मिशा, टोकदार नाक आणि पट्टेदार पगडी घालून एअर इंडियाचा हा शुभंकर महाराजा गेली 77 वर्ष एअर इंडियाच्या प्रवाशांची सेवा करत आहे.
कसा आहे एअर इंडियाचा नवा लोगो ?
एअर इंडियाच्या या नव्या लोगोमध्ये त्यांच्या शुभंकर महाराजाला आराम देण्यात आला आहे. यामध्ये लाल, पांढरा आणि जांभळा या तीन रंगांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लाल आणि पांढऱ्या अक्षरात एअर इंडिया ही अक्षरं रेखाटण्यात आली आहेत. तसेच यामधील जांभळा रंग हा एअर विस्तारामधून घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे. त्यामुळे या कंपानीचे पुन्हा एकदा ब्रँडिंग करण्यात आले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी एअर इंडियामध्ये अनेक बदल होणार असल्याचं म्हटलं होतं. या बदलाचाच एक भाग म्हणून एअर इंडिच्या लोगोमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाची संपूर्ण मालकी टाटा समूहाकडे गेली आहे. एअर इंडियाच्या जुन्या लोगोमध्ये नारंगी कोणार्क चक्रासह एक लाल रंगाचा हंस देखील आहे. पण आता हे चक्र आणि हा हंस दोन्हीही गायब होणार आहेत.
टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावून ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती. कर्जाच्या खाईत बुडालेली एअर इंडिया कंपनी ही टाटाने सर्वाधिक बोली लावून खरेदी केली. टाटाच्या ताब्यात ही कंपनी गेल्यानंतर यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. त्यामुळे आता एअर इंडियामध्ये झालेला बदल ही कंपनीमधील बदलांचा एक भाग आहे. एअर इंडियाचा हा कार्यक्रम नव्या युगाची नांदी असणार असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या बदलासोबतच आणखी कोणते बदल कंपनीमध्ये होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Chandrayaan-3 नं काढले पृथ्वी आणि चंद्राचे फोटो, अवकाशातून पृथ्वी कशी दिसते? एकदा पाहाच