Air India : टाटा (Tata) समूहाकडे मालकी आल्यानंतर एअर इंडियाकडून (Air India) मोठे निर्णय घेतले जात आहेत. Air India Express आणि AirAsia India च्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील वर्षी, 2023 च्या अखेरीस याचे विलिनीकरण होण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियाने AirAsia India मध्ये 100 टक्के भागीदारीसाठी करार केला आहे. AirAsia India हा Tata Sons आणि Air Asia Investment Limited यांचा संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये टाटा सन्सचा वाटा 83.67 टक्के आणि एअर एशिया इन्व्हेस्टमेंटचा 16.33 टक्के वाटा आहे.


वर्षभरात विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार


एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विलिनीकरण 2023 च्या अखेरीस होऊ शकते. या माध्यमातून परवडणाऱ्या दरात विमान सेवा पुरवणारी एअरलाइन कंपनी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. विलिनीकरणानंतर निर्माण होणार्‍या नव्या कंपनीचे नाव 'एअर इंडिया एक्सप्रेस' असे असणार आहे. दरम्यान, एअरएशिया कंपनी 2014 मध्ये सुरू झाली होती. तर, एअर इंडिया एक्सप्रेसची 2005 मध्ये विमान सेवा सुरू झाली होती. एअरएशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन एअरलाइन्सच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून केली जात आहे. या प्रक्रियेला सुमारे 12 महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.


'या' कंपनीतील उर्वरित हिस्सा एअर इंडियाला विकण्याचा करार 


तत्पूर्वी, मलेशियन एअरलाइन एअरएशिया कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, एअरएशिया इंडिया विमान कंपनीत असणारा आपला उर्वरीत हिस्सा एअर इंडियाला विकण्यासाठी करार केला आहे. 


एअरएशिया एव्हिएशन ग्रुप लिमिटेडने सांगितले की, एअरएशिया इंडियामध्ये असणारा उर्वरीत हिस्सा एअर इंडियाला विकण्यासाठी एक शेअर करार केला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने या वर्षी जून महिन्यात एअर इंडियाद्वारे एअरएशिया इंडिया कंपनी खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 


जगातील सर्वात मोठ्या नागरी उड्डाण बाजारांपैकी एक


एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल दिला जाईल. विल्सन म्हणाले, "एअर इंडियाच्या अखत्यारीत असणाऱ्या आणि परवडणाऱ्या दरात विमान प्रवासाची संधी देणाऱ्या विमान कंपनीची निर्मिती सुरू करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) या वर्षी जूनमध्ये AirAsia इंडियाच्या संपूर्ण भागीदारीच्या प्रस्तावित अधिग्रहणास मान्यता दिली आहे. एअरएशिया एव्हिएशन ग्रुपचे (समूह) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बो लिंघम म्हणाले, "जेव्हा आम्ही 2014 पासून भारतात प्रथमच सेवा सुरू केली तेव्हा AirAsia ने चांगला व्यवसाय केला. जगातील सर्वात मोठ्या हवाई वाहतुकीची बाजारपेठेत आम्ही स्थान मिळवले.'