Jharkhand CM Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री  हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) हे आज अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीसमोर (ED) हजर राहणार नाहीत. बेकायदेशीर खाणकाम आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री  हेमंत सोरेन यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र, आज ते हजर राहणार नाही. आदिवासी मुख्यमंत्र्यांविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचे सोरेन यांनी सांगितले आहे. 
 
मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज रायपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदिवासी नृत्य महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, ईडीने सोरेन यांना समन्स बजावल्यानंतर  मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सत्ताधारी आमदारांची बैठक झाली. यामध्ये हे भाजपचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बैठकीत सहभागी झालेल्या सर्व आमदारांनी सरकार अस्थिर करण्यात गुंतलेल्या राज्यपालांसह केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात टप्प्या-टप्प्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.


ईडीच्या समन्सबाबत मुख्यमंत्री स्वत: बोलतील : राजेश ठाकूर


या संपूर्ण प्रकरणावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणाले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा रायपूरचा दौरा पहिलाच ठरला आहे. हा नियोजीत कार्यक्रम असून, तिथे ते आज जाणार आहेत. ईडीच्या समन्सबाबत मुख्यमंत्री स्वत: बोलतील असेही राजेश ठाकूर यावेळी म्हणाले. खरं तर, बेकायदेशीर खाण आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पंकज मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनंतर  ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावले आहे. ईडीने यापूर्वी पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले होते की, अटक करण्यात आलेल्या पंकज मिश्रा यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बँक खात्याशी जोडलेले चेकबुक सापडले होते. सापडलेल्या कागदपत्रातील दोन चेकवर मुख्यमंत्र्यांची सही आढळली होती.


सोरेन यांच्या घरावरही झाली होती छापेमारी


अवैध खाण उत्खनन प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात निवडणूक आयोगानं त्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील एका याचिकेवर राज्यपाला रमेश बैस यांच्याकडे आपले मत नोंदवले होते. मात्र, याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, यापूर्वी सोरेन यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली होती. या छाप्यात हेमंत सोरेन यांचं एक पासबुक आणि चेकबुक जप्त करण्यात आलं आहे. दुसरीकडे हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते पंकज मिश्रा यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली होती. पंकजा मिश्रा हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील आरोपी असून, त्यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Hemant Soren : झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; भाजपचा सभात्याग