नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हरएक प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. अशातच एक चिंतेची बाब समोर आली आहे. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते असं AIIMS च्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. 


AIIMS ने इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी  आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या संस्थांच्या सहाय्याने हा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये ब्रेक थ्रु इन्फेक्शन असलेल्या 63 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या 63 लोकांपैकी, 36 लोकांना कोरोना लसीचे दोन डोस तर 27 लोकांनी कोरोनाचा एकच डोस घेतला होता. त्यापैकी 51 पुरुष आणि 12 महिला होत्या. 


या 63 लोकांपैकी 10 लोकांना कोव्हॅक्सिनचा तर 53 लोकांना कोविशिल्डचा डोस देण्यात आले होते. कोविशिल्डचे आणि कोवॅक्सिनचे दोन डोस घेणारे 60 टक्के तर एक डोस घेणारे 77 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची लक्षण दिसली आहेत.  या दोन्ही लसी या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत पण त्याचे प्रमाण कमी असल्याचं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नामकरण केलं आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे. 


यामध्ये डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने डेल्टा हा व्हेरिएंट जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :