नवी दिल्ली : मेडिकलची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा 'नीट' ला राज्यातील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी सूट मिळाल्याने हा विषय थंड होत नाही तोवरच इंजिनीयरिंगसाठीही एकच राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्याची चर्चा सुरु झालीय.


 

 
देशातील सर्व इंजिनीयरिंग कॉलेजांचं नियंत्रण करणाऱ्या एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने याबाबत चाचपणी सुरु केलीय. मेडिकल काऊन्सिल आणि सीबीएसईने ज्याप्रमाणे एआयपीएमटी या परीक्षेला नीटमध्ये परावर्तीत केलं तसंच इंजिनीयरिंगच्या जेईई मेन या प्रवेश परीक्षेला देशभरात लागू करण्याचा विचार आहे. जेईई ही परीक्षाही सीबीएसईमार्फतच आयोजित केली जाते. सध्या जेईई मुख्य या परीक्षेच्या गुणांवर आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटी या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजांचे प्रवेश निश्चित केले जातात.

 

 
सध्या देशातील काही राज्यांच्या सरकारी इंजिनीयरिंग कॉलेजातील प्रवेशासाठी केंद्राच्या म्हणजेच सीबीएसईच्या जेईई मेन या प्रवेश परिक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. ही राज्ये त्यांच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेतच नाहीत. महाराष्ट्रात मात्र एमच सीईटी ही वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जाते. राज्यातील एमएच सीईटीच्या परीक्षेत एसएससी बोर्डाचा बारावीचा अभ्यासक्रम आहे.

 

 
इंजिनीयरिंगसाठीही देशभरात एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर अर्थातच नीट प्रमाणे त्याची जबाबदारीही सीबीएसईकडेच येईल. त्यावेळीही नीटला झाला तसा विरोध होण्याची शक्यता आहे.

 
त्यामुळेच एआयसीटीई म्हणजे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी इंजिनियरिंग साठी देशभरात एकच परीक्षा ही केवळ नियोजनाच्या आणि चर्चेच्या पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय. याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं.