Taj Mahal : ताज महालातील 22 खोल्या उघडण्याच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील आजची सुनावणी टळली आहे. मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी म्हणजेच, आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी होणार होती. मात्र वकिलांच्या संपामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी गुरुवारी होण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ताजमहालमध्ये बंद असलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर, याची एएसआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे.
याचिका काय?
ताज महालात हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावाही भाजपच्या प्रवक्त्यानं याचिकेत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताज महालबाबत अयोध्येतील भाजपच्या प्रवक्त्यानं ही याचिका दाखल केली आहे. मी ASI ला देखील ताजमहालमधील या 22 खोल्या बंद करण्याचं कारण काय आहे? असं विचारलं असल्याचा दावा भाजप प्रवक्यानं केला आहे. तसेच मी सांस्कृतिक मंत्रालयाला देखील विचारलं की, खोल्या बंद ठेवण्याचं खरं0 कारण काय आहे? सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली असल्याचं, भाजपच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.
कोणाच्या आदेशानं ताज महालातील खोल्या बंद करण्यात आल्या आहेत? असा सवाल याचिकाकर्त्यानं याचिकेतून केला आहे. ज्यावर त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळेच मी ही याचिका दाखल केली असल्याची माहिती भाजप प्रवक्यानं दिली आहे. ताज महाल ही छोटी जागा नाही. या खोल्या का बंद आहेत? याचं उत्तर मिळालं पाहिजे. या खोल्यांमुळे ताज महालाबाबत अनेकदा वाद निर्माण होत असल्याचंही याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.
पांढऱ्या शुभ्र संगमरवरी ताज महालाचा इतिहास
जगातील सात आश्चर्यापैकी ताज महाल एक. पांढऱ्या शुभ्र संगमरवरानं बांधलेली युमनेच्या तिरावर वसलेली ही इमारत पाहताच क्षणी मनात घर करते. देश-विदेशातून अनेक पर्यटक ताज महालाचं सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. ताज महालाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. इतिहासात मागे वळून पाहिलं तर ताज महाल मुघल बादशाह शाहजहान यांचं आपली पत्नी मुमताजवर प्रेम होतं. तिच्या निधनानंतर तिची आठवण म्हणून शाहजहान यांनी ताज महाल बांधला. ही संगमरवरी इमारत उभारण्यास तब्बल 21 वर्षांचा अवधी लागला होता.