नवी दिल्ली : नवजात बालकांसह ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना भारतीय रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. मातांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने ट्रेनमध्ये 'बेबी बर्थ' सुरु केले आहेत. मात्र, सध्या तरी त्यांची चाचणी सुरु आहे. दिल्ली विभागातील उत्तर रेल्वेने निवडक गाड्यांमध्ये चाचणी म्हणून 'बेबी बर्थ' सुरु केला आहे, जेणेकरुन मातांना त्यांच्या बाळांसह आरामात झोपता येईल.


या 'बेबी बर्थ'चे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. ज्यात लोअर बर्थला रेल्वेने एक खास सीट लावण्याची व्यवस्था केली आहे जी महिलांसाठी प्रवास करणाऱ्या बाळासाठी असेल. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हा बर्थ लावण्यात आल्या आहे. सध्या चाचणी म्हणून या बर्थची सुरुवात करण्यात आली आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली, लवकरच हा बेबी बर्थ अनेक ट्रेनमध्ये पाहायला मिळेल.






उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने 'बेबी बर्थ' नावाचा हा विशेष उपक्रम हाती घेतला होता, ज्यामध्ये खालच्या बर्थसोबत एक छोटा बर्थ जोडला जाईल, जो बाळासाठी असेल. त्याला बेबी बर्थ म्हटलं जाईल. ज्या महिला आपल्या मुलांसोबत प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा बर्थ फायदेशीर ठरेल. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मुलांना अतिरिक्त बर्थमध्ये झोपवून याचा फायदा घेता येईल. लहान मूल झोपेत असताना खाली पडू नये म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वे बर्थच्या बाजूला स्टॉपर देखील देण्यात आलं आहे. मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी या बेबी बर्थमध्ये घेण्यात आली आहे.


उत्तर रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करुन या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. हा उपक्रम मातृदिनासाठी समर्पित केला. प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रम म्हणून, लखनौ मेलच्या कोच क्रमांक 194129/B4 मध्ये बर्थ क्रमांक 12 आणि 60 मध्ये बेबी बर्थ सुरु करण्यात आला आहे, जेणेकरून आई आपल्या मुलासोबत आरामात प्रवास करु शकेल. ही सीट फोल्डेबल असून स्टॉपरने सुरक्षित आहे.