Martyr Agniveer Akshay Gawate : लोकसभेच्या पहिल्या सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केले. केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत शहीद दर्जा दिला जात नाही असे राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितले. याशिवाय शहीद झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांनाही मदत दिली जात नाही असा आरोपही केला होता. यावेळी राहुल गांधी यांनी बुलढाण्यातील शहीद अग्निवीर अक्षय गवते याचा उल्लेख केला होता. 


राहुल गांधींच्या या दाव्यानंतर आता शहीद अग्निवीरचे वडील लक्ष्मण गवते यांनी मोठा खुलासा केला आहे. लक्ष्मण गवते यांनी त्यांना आतापर्यंत एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांची मदत मिळाल्याची पुष्टी केली. अक्षय गवते हा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील अग्नी वीर जवान होता. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असताना तो शहीद झाला आहे.


राहुल गांधींचा आरोप 


सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्नीवर योजनेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शहीद अग्निवीर जवान अक्षय गवते यांचाही उल्लेख केला. अक्षय गवते हे सियाचीन येथे कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता. 


याबाबत शहीद जवान अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता अक्षय गवते यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी सांगितलं की, आतापर्यंत अक्षयचा विमा आणि राज्य सरकारने दिलेले दहा लाख रुपये असे मिळून त्यांना आतापर्यंत एक कोटी दहा लाख रुपयांची मदत मिळाली आहे. 


सरकारकडून अजून काय अपेक्षा आहेत असं विचारल्यानंतर लक्ष्मण गवते म्हणाले की, सरकारने अक्षयची बहिण श्वेता गवते हिला शासकीय सेवेत सामावून घ्यावं आणि जाहीर केलेली सर्व मदत त्यांना मिळावी. 


अग्निवीर कुटुंबाला किती मदत मिळते?


लष्कराच्या वेबसाइटनुसार, अग्निवीरचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्याला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण, 44 लाख रुपये एक्स-ग्रॅशिया रक्कम, चार वर्षांच्या योगदानासाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी आणि सरकारमध्ये जमा केलेल्या रकमेसह सेवा निधी मिळेल. 


ड्युटीवर असताना अग्निवीरचा मृत्यू झाला नाही, तर कुटुंबाला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान मिळते. त्याच वेळी अपंगत्वाच्या बाबतीत, अग्निवीरला अपंगत्वाच्या पातळीनुसार, 100 टक्के, 75 टक्के किंवा 50 टक्के असेल तर पूर्ण पगार आणि सेवा यावर अवलंबून 44 लाख रुपये, रुपये 25 लाख किंवा रुपये 15 लाख रुपये मिळतात. चार वर्षांपर्यंतचा निधी, आणि सेवा निधी निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान त्याला दिले जाते.


ही बातमी वाचा: