Agnipath Scheme : अग्निपथ योजनेंतर्गत सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांकडून जातीचे आणि धर्माच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सैन्य भरतीसाठी याच पद्धतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसारच आताही उमेदवारांकडून जात प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. धर्माच्या आधारे मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात अशी माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी दिली आहे.    


अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भारतीय लष्कराला इंफंट्री रेजिमेंटमध्ये ब्रिटिश काळापासूनची भरती प्रक्रिया बंद करून'ऑल इंडिया ऑल क्लास' तत्त्वावर भरती करायची आहे. लष्कराने आपल्या वेबसाइटवर अग्निवीरांशी संबंधित अटी व शर्ती जारी केल्या होत्या, त्यावेळी अग्निवीरांची भरती 'ऑल इंडिया ऑल क्लास' तत्त्वावर होईल, असे स्पष्टपणे लिहिले होते. म्हणजेच अग्निवीराला कोणत्याही रेजिमेंट आणि युनिटमध्ये पोस्टिंग दिली जाऊ शकते. आतापर्यंत लष्कराच्या इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सैनिकांची भरती जात, धर्म आणि प्रदेशाच्या आधारे होत होती.


सैन्यात इन्फंट्री रेजिमेंटची स्थापना ब्रिटिशांच्या काळात झाली. यामध्ये शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, गोरखा, डोगरा, कुमाऊं, गढवाल, बिहार, नागा, राजपुताना-रायफल्स (राजरीफ), जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री, जम्मू आणि काश्मीर रायफल्स या रेजिमेंटसा समावेश आहे.  ही रेजिमेंट धर्म आणि प्रदेशाच्या आधारे तयार करण्यात आली आहेत.  


स्वातंत्र्यानंतर  'द गार्ड्स'ही एकमेव  रेजिमेंट तयार करण्यात आली. परंतु, आता अग्निवीर योजनेंतर्गत लष्कराच्या सर्व रेजिमेंट्स 'ऑल इंडिया ऑल क्लास'वर आधारित असतील. म्हणजेच देशातील कोणताही तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतो. स्वातंत्र्यानंतर ही संरक्षण क्षेत्रातील एक मोठी संरक्षण सुधारणा मानली जात आहे. लष्कर कोणत्याही सैनिकाला त्याच्या गरजेनुसार कोणत्याही रेजिमेंटमध्ये पाठवू शकते.


अग्निपथ योजनेच्या सुरूवातीला लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव  लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्यात 75 टक्के भरती ही ऑल इंडिया ऑल क्लासच्या आधारावर केली गेली आहे. परंतु आता उर्वरित 25 टक्के भरीत देखील ऑल इंडिया ऑल क्लासच्या आधारेच होईल