Haryana Dsp Murder case :  हरियाणाच्या नूह जिल्ह्यात खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाच्या अंगावर ट्रक घालून त्यांची हत्या केली आहे.  सुरेंद्र सिंह बिश्नोई असे हत्या झालेल्या डीएसपीचे नाव आहे. चालकाला ट्रक थांबवण्यास सांगितल्यानंतर त्याने ट्रक सुरेंद्र यांच्या अंगावर घातून त्यांना चिरडले. यात सुरेंद्र यांचा मृत्यू झाला. याबाबत एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  


हरियाणातील तावडूजवळील पाचगाव येथे अरवली डोंगरावरील बेकायदेशीर उत्खनन सुरू होते. त्यामुळे डीएसपी सिंह हे मंगळवारी त्यांच्या पथकासह या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले होते. यावेळी येथून एक ट्रक निघाला होता. सिंह यांनी या ट्रकला थांबण्याचा इशारा दिला. परंतु, चालकाणे ट्रक थेट सिंह यांच्या अंगावर घातला आणि त्यांना चिरडले. या घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सिंह यांना उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 






डीएसपी सिंग हे 1994 मध्ये हरियाणा पोलिसमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पदावर भरती झाले होते. काही महिन्यांत ते निवृत्त होणार होते. परंतु, खान माफियांनी आज त्यांची हत्या केली. 


2015 पासून दरवर्षी नुहमध्ये अवैध खाणकामाच्या सुमारे 50 तक्रारी नोंदवल्या जातात.खाण माफिय आणि पोलिसांमध्ये वारंवार चकमकी होतात, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. 


एकाला अटक
दरम्यान, सिंह यांच्या हत्येनंतर एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पळून जात असताना पोलीस आणि संशयितामध्ये चकमक झाली.  यात संशयिताच्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.