Uddhav Thackeray:  आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करायची होती असा उल्लेख केला होता, असं खासदार राहुल शेवाळे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.    


राहुल शेवाळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सागितलं होत की, ''मी माझ्या परीने युती करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की, ते जेव्हा पंतप्रधान मोदी यांना दिल्लीला भेटायला गेले होते. त्या भेटीत त्यांनी युतीचा उल्लेख केला होता. मोदींसोबत त्यांची एक तास चर्चा झाली. युती संदर्भात ही चर्चा होती. ही बैठक जूनमध्ये झाली आणि जुलैला अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे भाजपला असं वाटलं की, एकीकडे युतीची चर्चा होत आहे. दुरीकडे 12 भाजप आमदारांवर निलंबनाची करावी झाली. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पक्ष श्रेष्ठीमध्ये नाराजी निर्माण झाली आणि पुढची चर्चा रखडली.'' तसेच तुम्ही तुमच्या परीने युतीचे प्रयत्न करा, असं आम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले होते, असंही शेवाळे म्हणाले.   


तत्पूर्वी राहुल शेवाळे म्हणाले की, ''आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यानंत उद्धव ठाकरे यांच्यासोवबत जेव्हा सर्व खासदारांची बैठक झाली होती. त्यावेळी सर्व खासदारांनी 2024 मध्ये निवणूक लढवाची असेल, तर युती करणे खूप महत्वाची आहे, असा आग्रह धरला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणारी निवडणूक लढूया. मात्र आम्ही त्याला विरोध दर्शवला. त्यावेळी प्रत्येकानी आपल्या मतदारसंघातील अडचणीची माहिती अरविंद सावंत यांना दिली होती. जी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली.''  शेवाळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना आम्ही एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवराला समर्थन द्या, असं सांगितलं होत. जेणेकरून एनडीएमध्ये जाण्याचा मार्ग पुन्हा खुला होऊ शकेल, असंही आम्ही त्यांना सांगितलं होतं, असं राहुल शेवाळे म्हणाले आहेत.